शिक्षा सुनावताच बलात्कारी आरोपीने भर न्यायालयात न्यायाधीशांना फेकून मारली चप्पल


सुरत – न्यायाधीशांना बलात्कार प्रकरणातील एका आरोपीला शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर आरोपीने चप्पल फेकून मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून आरोपीला सुरतमधील एका न्यायालयाने एका मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. शिक्षा ऐकून संतप्त झालेल्या २७ वर्षीय आरोपीने न्यायाधीशांना चप्पल मारून फेकली.

यासंदर्भात पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, पाच वर्षांच्या मुलीवर या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी सूरत येथील न्यायालयाने २७ वर्षीय व्यक्तीला आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. विशेष पॉक्सो न्यायाधीश पीएस काला यांच्या न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर आरोपी सुजित साकेत संतप्त झाला आणि त्याने न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल फेकली. पण त्याचा नेम चुकला आणि चप्पल दुसरीकडे बॉक्सजवळ पडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ३० एप्रिल रोजी मध्य प्रदेशातील रहिवासी असलेल्या आरोपीने मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती. एका स्थलांतरित मजुराची पीडिता मुलगी होती. मुलगी एकटी दिसल्यावर आरोपीने तिला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने तिचे अपहरण केले. त्यानंतर तिला एका निर्जन ठिकाणी नेले आणि तिच्यावर अत्याचार करून गळा आवळून हत्या केली होती. नंतर आरोपीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. न्यायालयाने २६ साक्षीदारांनी दिलेल्या जबाबाचा विचार करत आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.