‘लोच्या झाला रे’मध्ये वेगळ्या भूमिकेत दिसणार अंकुश चौधरी


यंदा एकदम दणक्यात नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. कारण अनेक नवे चित्रपट आणि मालिका नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या यादीमधील एक चित्रपट म्हणजे ‘लोच्या झाला रे.’ अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी आणि सयाजी शिंदे अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘लोच्या झाला रे’ हा एक धमाकेदार विनोदी कौटुंबिक चित्रपट असणार आहे.

नुकतेच सोशल मीडियावर सुरेश जयराम यांच्या नाटकावर आधारित ‘लोच्या झाला रे’ या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात करण्यात आले आहे. हे पोस्टर पाहून हा एक तुफान विनोदी चित्रपट असेल असे दिसत आहे. आता कोणामुळे कोणाच्या आयुष्यात लोच्या झाला आहे, हे मात्र चित्रपट पाहिल्यावरच कळेल. मुळात पहिल्यांदाच हे चारही कलाकार एकत्र मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणार हे एवढे मात्र नक्की!

परितोष पेंटर आणि रवी अधिकारी यांनी ‘लोच्या झाला रे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यापूर्वी धमाल, टोटल धमाल अशा बॅालिवूडच्या चित्रपटांचे परितोष पेंटर यांनी लेखन केले आहे. ‘लोच्या झाला रे’चे छायाचित्रण संजय मेमाणे यांचे असून ज्यांनी आधी झिम्मा, हिरकणी, हाफ तिकीट सारख्या सुपरहिट चित्रपटांच्या छायाचित्रणाची धुरा सांभाळली होती. या चित्रपटाचे चित्रीकरण लंडनमध्ये करण्यात आले आहे. यात विजय पाटकर, प्रसाद खांडेकर आणि रेशम टीपणीस यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.