आदित्य ठाकरेंनी मांडली मुंबईतील कोरोनाची स्थिती आणि ओमिक्रॉनचा धोका याविषयी सविस्तर भूमिका


मुंबई – राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या गेल्या काही दिवसांपासून हळूहळू वाढताना दिसत आहे. तसेच, ओमिक्रॉनबाधितांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. पण, रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण त्या तुलनेत कमी असल्यामुळे ही आरोग्य यंत्रणेसाठी आणि प्रशासनासाठी दिलासादायक बाब ठरली आहे. पण, असे असले, तरी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात येत आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी या पार्श्वभूमीवर राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि शाळा-कॉलेजांविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. मुंबईतील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

गेल्या काही दिवसांत वाढत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येवर यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी भाष्य केले. पुढील वर्षी फेब्रुवारी काय किंवा आत्ता काय. वाढती बाधितांची संख्या ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते. पण पॅनिक व्हायची गरज नाही, घाबरण्याची गरज नाही. विनाकारण घराबाहेर पडू नका. ओमिक्रॉन गंभीर नसल्याचा सगळीकडे समज आहे. तशी निरीक्षणे देखील दिसत आहेत. पण ते तसेच राहील का? यावर सविस्तर संशोधन झालेले नसल्यामुळे काळजी घेणे गरजेचे असल्याचे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

दरम्यान, मुंबईतील इमारती सील करण्याची कारवाई करण्यात येऊ शकते, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. जरी कोरोनाबाधितांची संख्येत वाढ होत असली, तरी पॅनिक होण्याची गरज नाही. डॉक्टरचा सल्ला महत्त्वाचा आहे. ट्रेस आणि टेस्ट करत राहणं आवश्यक आहे. दहाहून जास्त कोणत्याही बिल्डिंगमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर अशा इमारती सील करण्यात येतील. आत्ता आपल्याकडे ५४ हजार बेड उपलब्ध आहेत. बाहेरून येणारे किंवा आपल्याकडचे पॉझिटिव्ह हे जास्तीत जास्त लक्षणे नसलेले आहेत. पण तरीही आपण हलगर्जीपणा करणे चुकीचे राहील, असे ते म्हणाले.

दरम्यान, ओमिक्रॉनबाबत व्हॉट्सअॅपसह अन्य सोशल मीडियावर व्हायरल मेसेजवर देखील त्यांनी निशाणा साधला. सध्या व्हॉट्सअॅपसह अन्य सोशल मीडियावर ओमिक्रॉन गंभीर आहे, नाही, असे सगळे सुरू आहे. पण हे सगळे आपण डॉक्टरांवर सोडायला हवे. आपण किंवा सोशल मीडिया ठरवायला लागलो की ओमिक्रॉन गंभीर नाही, तर ते चुकीचे असल्याचे ते म्हणाले.

आपण शाळा, कॉलेज याविषयी ट्रिगर लावलेले आहेत. ते हिट झाल्यानंतर त्याविषयी निर्णय घेतला जाईल. गरज पडली, तर पुढच्या आठवड्यात त्याविषयी निर्बंधांबाबत निर्णय घेतला जाईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले. डबलिंग रेट वाढला आहे. पण रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. ज्या वेगाने केसेस वाढत आहेत, मास्क लावणे, काळजी घेणे, दुसरा डोस घेणे हे आम्ही सांगत असल्याचे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.