चिथावणीखोर भाषणप्रकरणी पुण्यात कालीचरण महाराजांसह मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल


पुणे : कालीचरण महाराज आणि मिलिंद एकबोटे यांच्याविरुद्ध चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी आता पुण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 19 डिसेंबरला पुण्यातील नातूबागेत समस्त हिंदू आघाडीच्या वतीने अफझलखान वधाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला होता. कालीचरण महाराज, मिलींद एकबोटे आणि इतरांनी यावेळी समाजामध्ये तेढ निर्माण होईल, अशी भाषणे केली. सोशल मीडियावर त्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पोलीसांनी त्याची दखल घेतली आणि चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

कालीचरण महाराज, मिलिंद एकबोटे, नंदकुमार एकबोटे, मोहन शेटे, भाजपच्या पुण्यातील नगरसेविका मंजुषा नागपुरे यांचे पती दीपक नागपुरे आणि दिगेंद्रकुमार यांच्या विरोधात पुण्यातील खडकमाळ पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कालीचरण महाराजाने काही दिवसांपूर्वी महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल त्याच्यावर छत्तीसगडमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर मिलिंद एकबोटेवर कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाबरोबरच इतरही अनेक गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.