रॉयल एन्फिल्डच्या ‘सुलतान ६५०’ चे दर्शन
देशातील प्रमुख वाहन कंपनी रॉयल एन्फिल्डची इंटरसेप्टर ६५० बाईक भारतीय बाजारातील विक्रमी विक्री होणाऱ्या ६५० सीसी मधील एक ठरली आहे. याच इंटरसेप्टर वर आधारित लेटेस्ट मॉडीफाईड बाईक निव मोटरसायकल्सने तयार केली आहे. या बाईकचे नामकरण ‘सुलतान ६५०’ असे केले गेले आहे. या कन्सेप्ट बाईकचे डिझाईन नवनीत सुरी यांनी केले असून ते फारच चर्चेत आले आहे.
या संदर्भात नीव मोटरसायकल्स कडून सांगितले गेले की, लॉकडाऊनचा काळ त्यांच्यासाठी उत्पादक वेळ म्हणून कारणी लागला. या काळात डिझाईनची जी स्वप्ने पहिली त्यावर काम करता आले. नव्या कन्सेप्टचा विचार दीर्घकाळ डोक्यात होता आता ती कन्सेप्ट वास्तवात उतरविण्याची संधी मिळाली. या बाईकसाठी सुलतान हेच नाव डोक्यात होते. ही मुळात स्क्रॅबलर प्रकारातील आहे. पहिल्याच दृष्टीक्षेपात ती लोकांच्या नजरेत भरेल असे अग्रेसीव्ह डिझाईन आहे. अनोख्या स्टायलिश एलीमेंट मधले एक साईड माउंटेड ड्यूल पॉड इन्स्ट्रुमेन्ट कन्सोल हे एक आहे. फ्युअल टँकवर थ्री डी रॉयल एन्फिल्ड लोगो, साईड माउंटेड नंबर प्लेट, टयूबलेस टायर, सुलतान मॉनिटर सह फ्रंट व्हील कव्हर, सिंगल पीस सीट, ऑल एलईडी हेडलाईट, टेललाईट आहेत.
या बाईकच्या इंजिनिअरिंग मध्ये बदल नाही. तिला ६४८ सीसीचे पॅरलल ट्वीन फोर स्ट्रोक एअर ऑईलकुल्ड इंजिन दिले गेले असून त्याला सहा स्पीड गिअरबॉक्सची जोड आहे.