देशात सर्वप्रथम फाईव्ह जी सेवा सुरु होणाऱ्या शहरात पुणे सामील

नवीन वर्षाच्या अगोदर चार दिवस म्हणजे मंगळवारी देशातील १३ प्रमुख शहरात लवकरच फाईव्ह जी सेवा सुरु होत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. फोरजी च्या तुलनेत फाईव्ह जीचा स्पीड १० पट अधिक असेल. या सेवेसाठी ज्या तेरा शहराची निवड करण्यात आली आहे त्यात महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या शहरांचा समावेश आहे. अन्य शहरात गुजराथमधील अहमदाबाद, जामनगर, गांधीनगर ही तीन शहरे आहेत. तसेच लखनौ, गुरूग्राम, दिल्ली, चंदिगढ, बंगलोर, चेन्नई, हैद्राबाद, कोलकाता या शहरांचाही समावेश आहे.

भारती एअरटेल, रिलायंस जिओ, वोडाफोन आयडिया या तीन कंपन्या आणि मोबाईल अॅक्सेसरिज बनविणाऱ्या एरिक्सन नोकिया यासाठी परस्पर सहकार्याने काम करत आहेत. नोकियाने याच शहरात प्रथम ट्रायल आणि टेस्टिंग सुरु केले होते. या शहरांची निवड करण्यामागे येथे इंटरनेट युजर्सची मोठी संख्या हे कारण आहे. शिवाय फाईव्ह जी सेवा फोर जी च्या तुलनेत महाग असणार आहे. त्यामुळे छोट्या शहरात त्याला फारसा प्रतिसाद मिळणे कदाचित अवघड असेल असे सांगितले जात आहे.

फाईव्ह जी हे इंटरनेट नेटवर्कचे पाचवे जनरेशन नेटवर्क आहे. त्याच्या माध्यमातून वायरलेस ब्रॉडबँड सेवा हाय स्पीडने दिली जाते. या सेवेमुळे मनोरंजन, संचार क्षेत्रात मोठा बदल होणार आहे. युजर्स सहज सुलभतेने काम करू शकतील. भारतात आगामी पाच वर्षात फाईव्ह जी युजर्सची संख्या ५० कोटींपेक्षा अधिक असेल असा अंदाज आहे. व्हिडीओ गेमिंग, युट्यूब, व्हॉटस अप कॉल सेवा लक्षणीय सुधारतील तर चित्रपट २० ते २५ सेकंदात डाऊन लोड होणार आहेत. कृषी क्षेत्रात ड्रोन वापर संभव होण्यास याची मदत होईल तसेच विनाचालक वाहने, मेट्रो ऑपरेट करणे सोपे होणार आहे.