जादुगार सम्राट करोना जागृतीसाठी करणार जादू

भारतावर करोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट पडू लागले असताना सर्वसामान्य नागरिकांमध्ये करोना विषयी जागृती निर्माण करण्यासाठी प्रसिद्ध जादुगार सम्राट शंकर पुढे आले आहेत. ते आपल्या जादूच्या कलेच्या माध्यमातून म्हणजे जादूने साबण, सॅनिटायझर, मास्क तयार करून दाखविणार आहेत आणि या वस्तूंचा नियमित वापर करा असे आवाहन प्रेक्षकांना देणार आहेत. जादुगार सम्राट, कोविड १९ लसीचे दोन डोस घेतले तर करोना पासून बचाव करता येतो असेही समजावणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार गेली ४५ वर्षे देश विदेशात ३० हजारापेक्षा अधिक जादूचे प्रयोग केलेल्या जादुगार सम्राट यांनी करोना जागृती अभियानासाठी पाच राज्यांची निवड केली आहे. त्यात दिल्ली, हरियाना, पंजाब, उत्तर प्रदेश आणि राजस्तान या राज्यांचा समावेश आहे. जादुगार सम्राट त्यांचे जादूचे हे प्रयोग मोफत करणार आहेत. ते म्हणाले, मी जादूने हत्ती, कार अश्या अनेक वस्तू गायब करू शकतो. आत्ता करोनाला गायब करण्याची गरज आहे. कोविड प्रोटोकॉलचे पालन करणे आवश्यक आहे, लसीकरण करून घेणे आवश्यक आहे मात्र जनता त्या बाबत अतिशय बेपर्वा असल्याचे दिसत आहे.

देशात १० कोटी पेक्षा अधिक लोकांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत हे सत्य असले तर लाखो लोकांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही हे ही खरे आहे. माझ्या कलेच्या म्हणजे जादूच्या माध्यमातून मी लोकजागृती करण्याचे ठरविले आहे. जादुगार सम्राट शंकर यांचे जादूचे प्रयोग राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यपाल, मंत्री आणि अनेक बॉलीवूड कलाकारांनी पाहिले आहेत.