कोविड बुस्टर डोस सूचनेसाठी येणार एसएमएस
कोविड १९ लसीच्या बुस्टर डोस संदर्भातील सूचना कोविन अॅपच्या माध्यमातून एसएमएस करून संबंधिताना दिली जाणार असल्याचे कोविन प्रमुख डॉ. आर.एस. शर्मा यांनी जाहीर केले आहे. नवीन वर्षात जगातील अन्य देशांप्रमाणेच भारतात सुद्धा कोविड १९ लसीचा बुस्टर किंवा प्रीकॉशनल डोस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून सरकारी निर्देशानुसार आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर, निवडणूक कार्यक्रमातील कर्मचारी आणि ६० वर्षांच्या वरील व लसीचे दोन डोस झालेले ज्येष्ठ नागरिक त्यासाठी पात्र ठरणार आहेत.
बुस्टर डोस कधी मिळणार आणि त्यासाठी कधी नोंदणी करायची याबाबत लोकांच्या मनात संभ्रम आहे. त्याविषयी बोलताना डॉ. शर्मा म्हणाले, दुसरा डोस घेतल्यानंतर नऊ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण झाले कि तिसऱ्या डोस साठी नोंदणी करता येणार आहे. ज्यांचे दोन डोस झाले आहेत त्यांची माहिती अगोदरच कोविन प्लॅटफॉर्मवर नोंदविलेली आहे. त्यात संबंधित व्यक्तीला दुसरा डोस कधी दिला याची तारीख सुद्धा आहे. त्यानुसार ९ महिने पूर्ण झाले कि कोविन अॅप सूचनेसह एसएमएस पाठवेल आणि त्यात डोस साठी नोंदणी करा अशी सूचना असेल. त्यानंतर मोबाईलवरून नोंदणी करता येणार आहे.
१० जानेवारी २०२२ पासून प्रीकॉशनल डोस किंवा बुस्टर देण्याची सुरवात होत आहे. मात्र ज्या लसीचे पहिले दोन डोस घेतले तीच लस परत देणार कि दुसऱ्या लसीचा बुस्टर डोस देणार याचा खुलासा लवकरच केला जात आहे. १५ ते १८ वयोगटासाठी मात्र कोवॅक्सिन लसच दिली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.