कोण असेल मुकेश अंबानींचा उत्तराधिकारी?

देशातील सर्वात श्रीमंत आणि बडे उद्योजक रिलायंसचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी रिलायंस समूहात नेतृत्व बदल केले जात असल्याचे संकेत मंगळवारी दिले आहेत. रिलायंसचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्या जन्मदिवसाच्या कार्यक्रमात बोलताना मुकेश यांनी युवा पिढीकडे जबाबदारी सोपविण्याची वेळ आली असल्याचे सांगितले. त्यामुळे मुकेश यांचा उत्तराधिकार कुणाकडे जाणार याची चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे मुकेश यांनी व्यवसाय उत्तराधिकारी संदर्भात प्रथमच वक्तव्य केले आहे.

मुकेश म्हणाले, माझ्या वरिष्ठ सहकाऱ्यांसह चर्चा सुरु असून वरिष्ठांनी युवा पिढीकडे जबाबदारी सोपविण्याच्या प्रक्रियेला वेग दिला गेला आहे. रिलायंस समूहाची येत्या काही वर्षात प्रतिष्टीत आणि मजबूत उद्योग समूह होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. स्वच्छ हरित, उर्जा क्षेत्रे, दूरसंचार या व्यवसायांची यात महत्वाची भूमिका आहे. दोन्ही क्षेत्रांची वाढ अतिशय वेगाने होत आहे. मोठी स्वप्ने आणि अश्यक्य ते शक्य करण्यासाठी योग्य लोक जोडणे आणि योग्य नेतृत्व यांची गरज आहे. आम्ही मार्गदर्शक होऊन युवा नेतृत्वाला सक्षम करणे, त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. ते आमच्यापेक्षा चांगली कामगिरी करतील तेव्हा टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक करणेही आवश्यक आहे.

मुकेश यांनी त्यांचे वडील धीरूभाई यांच्या पश्चात रिलायंस समूहाची जबाबदारी घेतली होती. मुकेश आता ६४ वर्षांचे असून त्यांना आकाश, अनंत अशी दोन मुले आणि ईशा ही मुलगी आहे. या तिघांपैकी कुणाला कुठला व्यवसाय मिळेल याचे अंदाज वर्तविले जाऊ लागले आहेत.