अत्याधिक थंडीपासून सैनिकांचा बचाव करणार स्वदेशी कपडे

भारतीय सेनेसाठी डीआरडीओ सातत्याने काम करत असून सैनिकांच्या महत्वाच्या गरजा पूर्ण व्हाव्या यासाठी येथे सातत्याने संशोधन केले जात आहे. यातून देशाला आत्मनिर्भर करण्याचे आव्हान डीआरडीओने स्वीकारले आहे. अत्याधिक म्हणजे असह्य थंडीमध्ये सीमेवर जागरूक असणाऱ्या सैनिकांना पुरेसे संरक्षण देऊ शकतील असे उबदार, गरम कपडे बनविण्याचे तंत्रज्ञान डीआरडीओने विकसित केले असून पाच भारतीय कंपन्यांना हे तंत्रज्ञान दिले गेले आहे. सोमवारी दिल्लीत हे तंत्रज्ञान डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. सतीश रेड्डी यांनी पाच कंपन्यांना हस्तांतरित केले.

हिमालयाच्या अति उंच शिखरांवर, हिमनद्या परिसरात रात्रंदिवस जागरूक राहून पहारा देणाऱ्या सैनिकांना विशेष प्रकारच्या उबदार कपड्यांची गरज असते. अश्या प्रकारचे कपडे, पर्वतारोहणांसाठी आवश्यक सामग्री, उपकरणे भारत अन्य देशातून आयात करतो. पण आता असे कपडे देशातच बनविले जाणार आहेत. डीआरडीओने विकसित केलेल्या ईसीडब्ल्यूसीएस तंत्रज्ञानामुळे हे शक्य झाले असल्याचे डॉ. रेड्डी यांनी सांगितले. अति उंच आणि अति थंड प्रदेशात, विविध प्रकारच्या हवामानात अपेक्षित असलेले संरक्षण हे कपडे सैनिकांना देऊ शकतात.

यात थर्मल इन्शुलेशन चा वापर तीन पातळीवर केला गेला आहे. त्यामुळे १५ डिग्री ते उणे ५० डिग्री तापमानात हे कपडे उपयुक्त ठरतील अश्या प्रकारे त्यांचे डिझाईन केले गेले आहे. सर्व परिस्थितीत सैनिकांच्या शरीराचे तापमान योग्य प्रमाणात राखले जाईल शिवाय त्यांना हालचाली करताना सुद्धा सहजपणा जाणवेल. श्वसन सहज होईल आणि अतिघाम आला तर तो कपड्यात सहज शोषला जाईल. हे कपडे वॉटरप्रुफ आणि हिटप्रुफ आहेत असेही डॉ. रेड्डी यांनी सांगितले.