पंजाबमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘या’ माजी क्रिकेटरसह २ काँग्रेस आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश


अमृतसर – पंजाबमधील राजकीय घडामोडींना आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर वेग आला आहे. या दरम्यान एका माजी क्रिकेटरसह २ काँग्रेस आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यात माजी क्रिकेटपटू दिनेश मोंगिया यांचाही समावेश आहे. त्यांनी मंगळवारी (२८ डिसेंबर) भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचबरोबर काँग्रेसच्या २ आमदारांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

४४ वर्षीय दिनेश मोंगिया हा डावखरा फलंदाज पंजाबमधील आहे. आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनेश मोंगियाचा भाजप प्रवेश झाला आहे. याशिवाय विद्यमान काँग्रेस आमदार फतेह सिंग बाजवा आणि बदविंदर सिंग लड्डी यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

विशेष म्हणजे नुकतीच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बंडखोर नेते अमरिंदर सिंग आणि माजी केंद्रीय मंत्री सुखदेव सिंग धिंडसा यांनी बैठक केली. या बैठकीनंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी भाजपासोबत आगामी निवडणुकीतील युतीची अधिकृत घोषणा केली. यानंतर आता काँग्रेस आमदारांचा आणि माजी क्रिकेटर दिनेश मोंगिया यांचा भाजप प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.

भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत या भाजप प्रवेशावर बोलताना म्हणाले, या नव्या नेत्यांचे आम्ही पक्षात स्वागत करतो. यामुळे भाजपची पंजाबमधील ताकद वाढत आहे. पंजाबमधील भाजपचे अस्तित्व कायमच दुय्यम राहिले आहे. तत्पूर्वी शिरोमणी अकाली दलासोबतची युती असतानाही भाजप दुसऱ्या क्रमांकावरच होती. त्यामुळेच आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून पंजाबमधील प्रसिद्ध चेहरे पक्षात घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचा परिणाम म्हणून सध्या या नेत्यांचा भाजप प्रवेश होत आहे.