१२ आमदार निलंबन प्रकरणी राज्य सरकारवर सुधीर मुनगंटीवारांची खोचक टीका!


मुंबई – आज राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. विधानभवनात या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. एकीकडे निलंबित आमदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी विरोधकांनी केलेली असताना दुसरीकडे राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी राज्य सरकारला अद्याप मंजुरी दिलेली नसल्याने त्यावरूनही राजकारण सुरू झाले आहे. आता भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या पार्श्वभूमीवरुन राज्य सरकारवर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. तसेच, यावेळी बोलताना त्यांनी रामायण, महाभारतातील उदाहरण देखील दिले आहे.

आम्ही वर्षभर विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी आग्रही होतो. पण सरकारच्या मनात काय बेईमानी होती, माहिती नाही. आम्ही १२ आमदारांबाबत विनंती करत होतो. लोकशाहीच्या मार्गाने राज्य न चालवता चेहरा लोकशाहीचा आणि ह्रदय हुकुमशाहीचे, असा प्रयत्न तुम्ही करत आहात. पण १२ आमदारांना मतदानाचा अधिकार आहे. तो पवित्र अधिकार आहे. घटनेत तुम्हाला मतदारांना मतदानापासून वंचित ठेवून निवडणूक घेता येत नाही. तुम्ही निवडणूक घ्या, ८ दिवस अजून अधिवेशन वाढवा. कदाचित आम्ही या निवडणुकीत तुमच्या बाजूनेच उभे राहू. शेवटी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आमचा कोणताही हट्ट नाही. लोकशाहीची परंपरा खंडित न करणारा, सर्वांना न्याय देणारा, जनतेच्या प्रश्नांबाबत गंभीर असणारा, निर्देश देऊन राज्य सरकारला दिशा देणारा अध्यक्ष हवा असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

दरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांनी विधानभवनात एबीपीशी बोलताना भाजपच्या १२ निलंबित आमदारांच्या मुद्द्यावरून सरकावर खोचक निशाणा साधला आहे. त्यांना देव सद्बुद्धी देवो. शेवटी हट्ट रावणालाही मानवणारा नव्हता, दुर्योधन-दु:शासनालाही मानवणारा नव्हता. भगवान कृष्ण शिष्टाई करण्यासाठी गेले, तेव्हा दुर्योधन म्हणाला मी सुईच्या अग्रावर मावेल एवढीही जमीन देणार नाही. आता त्याची नॅनो कॉपी सरकार करत असेल, तर या सरकारला सुद्धा त्या महाभारतात पांडवांना सोडणाऱ्या कर्णाचा जसा पराजय झाला, तसे येथेही दुर्योधन-दु:शासनासारखे सरकार वागायला लागले आणि पांडवांसोबतचा कर्ण तिकडे गेला असेल, तर कृष्णाचा अवतार असलेली जनता त्यांना पराभवाचा झटका दिल्याशिवाय राहणार नसल्याचे मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

मुनगंटीवार यांनी यावेळी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याच्या चर्चेवर देखील प्रतिक्रिया दिली. नरेंद्र मोदी एवढे सहनशील आहेत, की लोकशाहीच्या मार्गानेच एखाद्याचा पराभव व्हावा, कायद्याची चोरवाट वापरू नये, असे त्यांचे तत्व आहे. आत्तापर्यंत ९८ वेळा घटनाबाह्य वर्तणूक या सरकारने केली आहे. मला भिती वाटते की या केसेस घेऊन उद्या सर्वोच्च न्यायालयात कुणी गेले, तर राष्ट्रपती सोडा, सर्वोच्च न्यायालय देखील म्हणू शकेल की राष्ट्रपती राजवटीसाठी राज्यात योग्य परिस्थिती असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.