शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण


मुंबई – राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. काल (सोमवारी) हिवाळी अधिवेशनात वर्षा गायकवाड उपस्थित होत्या. वर्षा गायकवाड यांच्या संपर्कात अनेक मंत्री, आमदार आल्याची माहिती मिळत आहे. यासंदर्भातील माहिती त्यांनी स्वतः ट्वीट करुन दिली आहे.

आपल्या ट्विटमध्ये वर्षा गायकवाड म्हणाल्या की, आज मला कळले की काल संध्याकाळी प्रथम लक्षणे जाणवल्यानंतर माझी कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे. माझी लक्षणे तुलनेने सौम्य आहेत. मी ठीक आहे आणि मी स्वतःला वेगळे केले आहे. गेल्या काही दिवसांपासून जे मला भेटले, त्यांना खबरदारी घेण्याची विनंती करते.


सध्या राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. त्यासोबतच ओमिक्रॉन बाधितांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच सध्या राज्यात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. कोरोनाने अधिवेशनातही शिरकाव केल्याचे पाहायला मिळत आहे. आत्तापर्यंत 35 जणांना राज्याच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. अधिवेशन सुरु झाल्यापासून 2 हजार 300 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी 35 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात पोलीस कर्मचारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान, वेगाने वाढणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या चिंतेचा विषय ठरला आहे. अशातच विधानसभा अध्यक्षांपदाच्या शर्यतीत असलेले के. सी. पाडवी यांच्याही नावाचा समावेश आहे. गेल्या 2 दिवसांत एकूण 35 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या 2 दिवसांत 2 हजार 300 जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये मंत्री के. सी. पाडवी, 3 पत्रकार, पोलीस कर्मचारी, विधिमंडळ आणि मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अशातच आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.