रोहिणी खडसे यांनी सांगितला प्राणघातक हल्ल्याचा थरारक अनुभव


मुक्ताईनगर – सोमवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या आणि जळगाव जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्ष रोहिणी खडसे खेवलकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हा हल्ला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे. त्याचबरोबर मला घाबरवण्यासाठी हा हल्ला होता, पण मी या अशा हल्ल्याने घाबरणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. महिलांच्या पाठीशी मी आहे आणि अशीच कायम उभी राहणार असल्याचे त्या म्हणाल्या आहेत. यावेळी रोहिणी खडसे यांनी बोदवड नगपंचायत निवडणुकीची पार्श्वभूमी या हल्ल्यासाठी कारणीभूत असल्याचा आरोप करत शिवसेना पदाधिकाऱ्यांकडे बोट दाखवले आहे.

आमचे जिल्हाध्यक्ष आणि मी थोडे दिवस आधीच निवडणुकीत मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर फिरत होतो, तेव्हा शिवसेनेच्या लोकांनी आमच्याशी हुज्जत घातली, धक्काबुक्की केली. याप्रकरणी आम्ही पोलिसांना निवेदनही दिले होते. आम्ही मुक्ताईनगरमधील अवैध धंद्याबाबतही लेखी तक्रार दिली होती, असे सांगत रोहिणी खडसे यांनी येथूनच हल्ल्याची पार्श्वभूमी तयार झाल्याचे म्हटले.

माझे मोठे बंधू निखिल खडसे यांची ३१ डिसेंबरला जयंती असते. त्यानिमित्ताने आम्ही सूतगिरणीत जमा होतो आणि श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही तयारीचा आढावा घेण्यासाठी गेलो होतो. त्यानंतर चांगदेवला एका कार्यकर्त्याच्या हळदीला गेलो. तिथून एका पदाधिकाऱ्याच्या घरी जाऊन १०-१५ मिनिटे बसलो. त्यावेळी तुमच्याविरोधात वातावरण तयार केले जात असून, काहींनी तुम्हाला फिरु देणार नसल्याचे सांगत पदाधिकाऱ्यांनी काळजी व्यक्त केली होती. मी त्यांना काळजी करु नका असे सांगितल्याची माहिती रोहिणी खडसे यांनी यावेळी दिली.

एका शॉर्टकटच्या रस्त्यातून निघत असताना आमच्यासमोर तीन दुचाकी आल्या. त्यांनी आमची गाडी अडवली. एकी दुचाकीवर तीन आणि इतर दोन्हींवर दोन-दोन असे सात लोक होते. चालक गाडीवर बसून होते. मागे बसलेले चौघे गाडीच्या दिशेने आले. यावेळी एकाच्या हातात पिस्तूल, एकाच्या हातात तलवार आणि एकाच्या हातात रॉड होता. ते माझ्या बाजूला आले, एकाने माझ्यावर पिस्तूल रोखून धरले होते. दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. पण तो उघडत नसल्यामुळे त्यांनी रॉड काचेवर मारला. मी खाली वाकले म्हणून वाचले. मला जीवे मारण्याच्या हेतूने आले होते, हे स्पष्ट आहे. कारण त्यांनी माझ्याच बाजूने हल्ल्याचा प्रयत्न केला, असा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे.

ड्रायव्हरला मी गाडी पळवायला सांगितली. ते लोक पोलीस येईपर्यंत फरार झाले होते. घरी पोहोचल्यावर गाडीचे किती नुकसान झाले हे कळाले. शिवसेनेचे पदाधिकारी या घटनेत असून त्यांची नावे तक्रारीत दिली आहेत. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले. या हल्ल्यात शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, पंकज कोळी व छोटू भोई हे तिघे सहभागी होते, असे रोहिणी खडसे यांनी सांगितले आहे. हातात पिस्तूल असणारी व्यक्ती सुनील पाटील नावाची होती, काही दिवसांपूर्वी त्याने माझ्या महिला पदाधिकाऱ्याच्या घरी जाऊन हात ओढण्याचा प्रकार केला होता. ज्याच्या हातात तलवार होती, तो पंकज कोळी चांगदेव ग्रामपंचायतीचा सदस्य आहे. छोटू भोई नावाच्या व्यक्तीने रॉडने हल्ला केला. इतर चौघांनाही मी ओळखू शकते, असे रोहिणी खडसे यांनी सांगितले आहे.