पेपरफुटीत प्रकरणात न्यासाचे अधिकारी देखील सामिल, पुणे पोलिसांची माहिती


पुणे – पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आरोग्य भरती पेपरफुटीसाठी न्यासा ही जबाबदार असल्याचे म्हटले आहे. आज पुणे पोलिसांनी पेपरफुटी प्रकरणाबाबत पत्रकार परिषद घेतली. त्यांनी ही माहिती त्यावेळी दिली. या पेपरफुटी प्रकरणात सामिल असलेल्या न्यासाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एका टोळीचा पर्दाफाश म्हाडा भरती परीक्षेआधी करण्यात आला होता. या भरती परीक्षेचा पेपर फुटण्याआधीच कारवाई करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यात आल्यानंतर आणखी काही जणांना अटक करण्यात आली होती. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज या प्रकरणाबाबत आणखी माहिती दिली.

आरोग्य विभागाचा २४ ऑक्टोबर रोजी झालेला गट क चा पेपरही फुटला होता. यामध्ये न्यासा कंपनीचे अधिकारी सहभागी असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी दिली. गट ‘ड’ चा पेपर न्यासाचे अधिकारी आणि बोटले आणि बडगिरे अशा दोन व्यक्तींच्या माध्यमातून फुटला. दोघे एकमेकांशी संबंधित होते का याचा तपास सुरू आहे. न्यासाच्या अधिकाऱ्यांसोबत गट ‘क’ चा पेपर फोडण्यात सहभागी असलेल्या दोन दलालांना अटक करण्यात आल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

हे दलाल एका पेपरसाठी पाच ते आठ लाख रुपये घेत असल्याची माहिती समोर आली आहे. यात न्यासा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी देखील सहभागी आहेत. त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. प्रश्नपत्रिका प्रिंट करताना न्यासाच्या अधिकाऱ्यांनी पेपर फोडल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली.