आता पुढच्या वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवडणूक


मुंबई – विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासूनच राजकारण तापल्याचे पाहायला मिळाले आहे. ही निवडणूक कधी होणार? याच अधिवेशनात होणार का? कशी होणार? राज्यपालांची मंजुरी कधी मिळणार? अशा अनेक मुद्द्यांवरून गेल्या ८ दिवसांपासून तर्क-वितर्क सुरू होते. पण, याबाबतचा निर्णय अखेर झाला असून विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आता पुढील वर्षी मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कालपासून यासंदर्भात पडद्यामागूनही अनेक घडामोडी घडत असल्याचे बोलले जात होते. पण, राज्यपालांनी आज राज्य सरकारला पत्राद्वारे उत्तर दिले आणि सगळी सूत्रे फिरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्य सरकारने यंदाच्या अधिवेशनातच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला होता. २८ डिसेंबर अर्थात मंगळवारचा दिवस देखील त्यासाठी नक्की करण्यात आला होता. त्यानुसार मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून राज्य सरकारने निवडणूक घेण्यासाठी मंजुरीचा तसा प्रस्ताव देखील सोमवारी राज्यपालांना पाठवला होता. पण, त्यावर राज्यपालांची मंजुरी मिळालेली नसल्यामुळे नेमकी निवडणूक होणार की नाही? याविषयी चर्चा सुरू झाली होती. राज्य सरकारला राज्यपालांच्या उत्तराची प्रतिक्षा असताना अखेर दुपारी राज्यपालांनी पत्राद्वारे राज्य सरकारला उत्तर पाठवले आहे.

आपल्या पत्रामध्ये राज्यपालांनी नेमक्या कोणत्या मुद्द्यांचा समावेश केला, याविषयी अद्याप माहिती समोर आलेली नसली, तरी बंद लिफाफ्यामध्ये राज्य सरकारला पाठवलेल्या या पत्रामध्ये राज्यपालांनी या निवडणुकीसाठी नकारात्मकच प्रतिसाद दिल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर हालचाली सुरू झाल्या आणि ही निवडणूक थेट पुढच्या वर्षी होणार असल्याचे समोर आले आहे.

यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये देखील राज्यपालांनी पत्र पाठवल्यानंतर या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. फोनवर या दोघांनी चर्चा केली असून यामध्ये राज्यपालांच्या परवानगीशिवाय निवडणुका घेतल्यास निर्माण होऊ शकणाऱ्या कायदेशीर पेचप्रसंगाविषयी देखील चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर अखेर ही निवडणूक पुढील वर्षी मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे.