सांगलीतील महिला वसतीगृहात कोरोनाचा शिरकाव; ३२ विद्यार्थिंनीं बाधित आढळल्याने खळबळ


सांगली – राज्य सरकारने कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी नवे निर्बंध लागू केले असतानाच कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रविवारी राज्यात कोरोनाचे १६४८ रुग्ण आढळले असून, आणखी ३१ जणांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाल़े. याचदरम्यान सांगलीतून एक चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. मिरज वैद्यकीय महाविद्यालयाच्या महिला वसतीगृहातील ३२ विद्यार्थिनींना कोरोनाची लागण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वसतीगृहातील एका मुलीने त्रास होऊ लागल्यानंतर चाचणी करुन घेतली. यावेळी तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या मुलींची तपासणी केली असता, सोमवारी रात्री अहवाल प्राप्त झाला. या चाचणी अहवालानुसार ११ मुली कोरोनाबाधित झाल्या आहेत.

मंगळवारी सकाळी मिळालेल्या माहितीनुसार, ३२ मुलींना कोरोनाची लागण झाली असून डीन डॉक्टर सुधीर नणंदकर यांनी अद्याप अहवाल आला नसल्याचे सांगत ११ पॉझिटिव्ह असल्याचे म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राज्यात कोरोनाबाधितांचा आलेख वाढत आहे. काही दिवसांपर्यंत दैनंदिन रुग्णसंख्या सातशे ते आठशेपर्यंत नोंदवली जात असताना आता दुप्पट रुग्ण नोंद होऊ लागली आहे, त्यामुळे कोरोनाबाधितांची वाढती संख्या ही तिसऱ्या लाटेची चाहूल असल्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.