माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर टीका


मुंबई – शिवसेना नेते व माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेच्या पायऱ्यावर बसून म्याव म्याव करत मांजराची नक्कल करत चिडवत होते ते आज लपून बसल्याची टीका नितेश राणे यांच्यावर केली आहे. नितेश राणेंवर संतोष परब हल्लाप्रकरणात अटकेची टांगती तलवार आहे. नितेश राणे सोमवारपासून अज्ञातवासात आहेत. त्यावरून दीपक केसरकर यांनी नितेश राणे यांच्यावर टीका केली.

माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले की, विधानसभेच्या पायऱ्यावर बसून म्याव म्याव करत मांजराची नक्कल करत चिडवत होते, ते आज लपून बसले आहेत. वाघाला घाबरून की न्यायालयाला घाबरून लपून बसले माहिती नाही. परंतु गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक पोलिसांना बघून घाबरतात ही वस्तुस्थिती असल्याचे दीपक केसरकर यांनी म्हटले. गुन्हा कोणी केला माहिती नाही, पण जे लपून बसले आहेत, ते कायद्यापासून आणि पोलिसांपासून लपून बसले असल्याचे केसरकर यांनी म्हटले आहे.

यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर देखील दीपक केसरकर यांनी टीका केली. चुकीचे वागत असाल, तर कायदा सर्वांसाठी समान आहे. केंद्रीय मंत्री आहात म्हणून मुलाला वाचवणार अशी भूमिका घेत असतील, तर उत्तर प्रदेश मधील मंत्र्याच्या पुत्राला वाचवताना काय झाले, ते पाहावे, असेही त्यांनी नारायण राणे यांना म्हटले.

सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ले करून 5 दिवस नितेश राणे पोलीस कोठडीत कस्टडीत राहिले हे विसरले आहेत. त्यावेळी त्यांना मिळालेला जामीन हा सशर्त जामीन मिळाला होता, अशी आठवणही केसरकर यांनी करून दिली. न्यायालय जामीन देताना खंडणी, हल्ले करण्यासारखे गुन्हे ज्यांच्यावर दाखल आहे. त्यांना जामीन देताना विचार करेल, अशी अपेक्षाही केसरकर यांनी व्यक्त केली.