नितेश राणेदेखील बाबा मला वाचवा या पद्धतीने पडद्याआड लपून बसले आहेत; शिवसेना आमदाराची टीका


मुंबई – सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील वातावरण शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील झालेल्या हल्ल्यामुळे चांगलेच तापले आहे. दरम्यान भाजप आमदार नितेश राणे यांचे नाव या प्रकरणात आल्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगली तलवार आहे. याप्रकरणी नितेश राणे यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जदेखील केला असून त्यावर सुनावणी होणार आहे. दरम्यान शिवसेना या प्रकरणावरुन आक्रमक झाली असून कडक कारवाईची मागणी करत आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक यांनीही विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना नितेश राणेंवर टीका केली आहे.

१८ तारखेला मतदारांवर दबाव आणण्यासाठी महाविकास आघाडीच्या प्रचारप्रमुखावर हल्ला झाला. नितेश राणेंचे नाव त्या हल्ल्यातील फिर्यादीने घेतले होते. नितेश राणे पोलीस तपासात दोषी आढळल्याचे प्राथमिकदृष्ट्या स्पष्ट झाल्यामुळे त्यांना अटक झाली पाहिजे. दोषी असतील तर त्यांना अटक होईल. पण आपल्या मंत्रीपदाचा फायदा घेत दबाव आणण्याचा प्रयत्न केंद्रीय मंत्री नारायण राणे करत असल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे.

केंद्रात माझे सरकार असल्याचे आव्हान नारायण राणे यांनी पोलिसांना दिल आहे. नितेश राणेदेखील बाबा मला वाचवा या पद्धतीने पडद्याआड लपून बसले आहेत. सरकारने आणि पोलिसांनी योग्य कारवाई केली पाहिजे, अशी मागणी आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता पोलिसांनी दोषी असल्यास कारवाई करावी. नारायण राणेंप्रमाणे नितेश राणेंनाही अटक होईल असा आम्हाला विश्वास असल्याचे यावेळी ते म्हणाले आहेत.

जेव्हा स्वत: वाघ म्हणून नारायण राणे वागत असतात, तेव्हा लोकांवर आरोप करत असतात. पण आपल्यावर आरोप झाले की पडद्याच्या आड लपतात, हे कालच्या भूमिकेवरुन स्पष्ट झाले आहे. कितीही आव्हाने नितेश राणे यांनी करु देत, पण आज ते लपून बसले आहेत. त्यांनी पोलिसांसमोर येऊन भूमिका मांडली पाहिजे. नारायण राणे, नितेश राणे चुकीच्या पद्धतीने वागत असल्यामुळे शिक्षा तर होणार आहे, असेही यावेळी त्यांनी म्हटले.