कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे दिल्लीत चित्रपटगृहांसह ‘या’ गोष्टींवर पुन्हा निर्बंध


नवी दिल्ली – सध्या कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे देशभरात धोका वाढत असल्यामुळे सर्वच राज्यांची सरकारे सावध होऊन पावले उचलत आहेत. नुकतेच सगळे काही सुरळीत सुरू होण्याच्या मार्गावर असताना या नव्या व्हेरिएंटने डोकेवर काढल्यामुळे आता पुन्हा एकदा निर्बंध लागू करावे लागले आहेत. दिल्लीतील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन दिल्ली सरकारने काही निर्बंध लागू केले आहे.

दिल्ली सरकारने श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती योजना(GRAP) अंतर्गत पुन्हा काही निर्बंध लावले आहेत. यामध्ये पुन्हा एकदा दिल्लीतील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स बंद करण्यात आले आहेत. मंगळवारी एक उच्चस्तरीय बैठक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बोलावली होती. हा निर्णय त्या बैठकीत घेण्यात आला. दिल्लीतील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट गेल्या काही दिवसांत ०.५ टक्क्यांच्या वर आहे. त्यामुळे सरकार श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती योजनेअंतर्गत (GRAP) यलो अलर्ट जारी करत आहे. त्या अंतर्गत नवे निर्बंध लागू करण्यात येत आहेत. यासंदर्भातील सविस्तर वृत्त डीएनए इंडियाने दिले आहे.

चित्रपटगृहे, नाट्यगृहे यांच्यासह हॉटेल्स, रेस्तराँ यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी आसनक्षमता ५० टक्के करण्यात आली आहे. काल दिवसभरात दिल्लीत ३३१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाल्यामुळे दिल्लीतील बाधितांची संख्या १४ लाख ४३ हजार ६८३ वर पोहोचली आहे. या वर्षी ६ जूननंतर ही एका दिवसातील सर्वाधिक बाधितांची संख्या आहे. दिल्लीत कोरोनाबाधित आढळण्याचा दर ०.६८ टक्क्यांवर पोहोचला आहे.