भाजप खासदाराचे वक्तव्य; १५ लाख रुपयांपर्यंतच्या भ्रष्टाचाराला मी भ्रष्टाचार मानत नाही


भोपाळ – सोशल मीडियावर सध्या एका भाजप खासदाराचा भ्रष्टाचारावर बोलतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यावर आता भरभरुन प्रतिक्रिया येत आहेत. हे भाजप खासदार या व्हिडीओत १५ लाख रुपयांपर्यंतचा भ्रष्टाचार भ्रष्टाचार नसल्याचे बोलताना दिसत आहेत. हे बोलण्याबरोबरच ते सरपंचाच्या निवडणुकीतच एकावेळी ७ लाख रुपयांचा खर्च येत असल्याचेही सांगत आहेत. तसेच मागील खर्च, पुढील निवडणुकीच्या तयारीचा १४ लाख खर्च आणि महागाई धरून १ लाख असे एकूण १५ लाखांचा भ्रष्टाचार चुकीचा नसल्याचे त्यांनी सांगितले. जनार्दन मिश्रा असे या भाजप खासदारांचे नाव आहे. मध्य प्रदेशमधील रिवा मतदारसंघाचे ते खासदार आहेत.

खासदार जनार्दन मिश्रा म्हणाले, ७ लाख रुपये सरपंच व्हायला लागतात. त्यामुळे जेव्हा लोक सरपंच भ्रष्टाचार करतो, अशी तक्रार घेऊन माझ्याकडे येतात, तेव्हा मी त्यांना गमतीने १५ लाख रुपयांपर्यंतचा भ्रष्टाचार केला असेल, तर मला सांगू नका असे सांगतो. त्याने १५ लाखांपेक्षा अधिकचा भ्रष्टाचार केला असेल तर मला सांगा.

कारण त्याने या निवडणुकीत ७ लाख रुपये खर्च केले, त्याने ७ लाख रुपये खर्च करून तो सरपंच झाला आहे. याशिवाय आणखी ७ लाख रुपये त्याला पुढील निवडणुकीसाठी हवे आहेत. महागाई वाढेल, तर आणखी १ लाख त्यात गृहित धरावे लागतील. असे हे १५ लाख रुपये होतात. १५ लाख रुपयांपेक्षा पुढे तो घोटाळा करत असेल, तर त्याचा भ्रष्टाचार समजू शकतो, असे जनार्दन मिश्रा यांनी सांगितले.

ही परिस्थिती आहे आणि समाजाचे हे नग्न चित्र आहे. याच क्रमाने वरच्या स्तरावर ही शिडी चढत जाते, असेही खासदार मिश्रा यांनी नमूद केले. रिवा या आपल्या मतदारसंघातील एका कार्यक्रमा आलेले असताना ते बोलत होते. विशेष म्हणजे मिश्रा यांच्या या व्हिडीओवर सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपचे हेच स्वच्छ आणि भ्रष्टाचार मुक्त शासन आहे का? असेही लोक विचारत आहेत.