अॅशेस मालिका; तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर दणदणीत विजय


मेलबर्न – ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा धुव्वा उडवला. ऑस्ट्रेलियाने एक डाव आणि 14 धावांनी दणदणीत विजय मिळवला. इंग्लंडच्या फलंदाजांची ऑस्ट्रेलियाच्या स्कॉट बोलंडच्या तिखट माऱ्यापुढे दाणादाण उडाली. बोलंडने चार षटकात सात धावा देत इंग्लंडच्या सहा फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याच्या प्रभावी माऱ्यासमोर इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 68 धावांमध्ये आटोपला. ऑस्ट्रेलियाने अवघ्या अडीच दिवसात तिसरी कसोटीसह मालिकाही खिशात घातली. बोलंडला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.

इंग्लंडने कसोटीच्या पहिल्या डावात 185 धावा केल्या होत्या. त्यानंतर यजमान ऑस्ट्रेलियाचा डावा 267 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 82 धावांची आघाडी मिळाली. पण, स्कॉट बोलंडच्या माऱ्यासमोर इंग्लंडच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. कर्णधार जो रूट आणि बेन स्टोक्स या दोघांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. रुटने सर्वाधिक 28 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या बोलंडने 7 धावांत 6 गडी बाद केले. तर, स्टार्कने 3 गडी बाद करत त्याला चांगली साथ दिली.

तत्पूर्वी, जेव्हा दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा इंग्लंडने दुसऱ्या डावात चार गडी गमावून 31 धावा केल्या होत्या. कर्णधार जो रूट आणि बेन स्टोक्स यांच्यावर सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा पराभव वाचवण्याची जबाबदारी होती. इंग्लंडला पहिला धक्का बेन स्टोक्सच्या रुपाने लागला. स्टार्कने बेन स्टोक्सला 11 धावांवर त्रिफळाचित केल्यानंतर स्कॉट बोलंडने इंग्लंडच्या फलंदाजीला सुरुंग लावला. बोलंडने अवघ्या 11 चेंडूमध्ये जॉनी बेअरस्टो, मार्क वूड आणि ऑली रॉबिन्सन यांना तंबूत धाडले. कॅमरन ग्रीनने जेम्स अँडरसरनला बाद करत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.