कालीचरण बाबाला ताबडतोब अटक करुन ठेचून काढा – जितेंद्र आव्हाड


मुंबई – वादग्रस्त वक्तव्यांमुळे छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील ‘धर्म संसद’ चर्चेत आहे. देशभरातून धर्माचे अनुयायी आणि महामंडलेश्वर या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल यावेळी वक्त्यांनी अपशब्द वापरले आणि नथुराम गोडसेचे कौतुक केले. महाराष्ट्रातील अकोल्याचे रहिवासी असलेल्या कालीचरण महाराज यांनीही या कार्यक्रमात महात्मा गांधींविषयी अपशब्द वापरल्याने संताप व्यक्त होत आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात यावरुन गदारोळ माजला असून नवाब मलिक यांनी कालीचरण महाराज यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.


दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीदेखील याप्रकरणी ट्वीट केलं असून अशा विषारी प्रवृत्तीला ताबडतोब अटक करा आणि ठेचून सुद्धा काढा अशा शब्दांत संताप व्यक्त केला आहे. हा कालीचरण बाबा मूळचा अकोल्याचा आहे. कधी आरक्षण, कधी मुस्लिम विरोध, तर कधी स्त्री हक्कविरोधात तो गरळ ओकत असतो आणि तो ऐकणाऱ्यांच्या मनात विष पसरविण्याचे काम करतो. अशा विषारी प्रवृत्तीला ताबडतोब अटक करा आणि ठेचून सुद्धा काढा. हा सनातनी आहे. निवडणुकीला उभा राहिला असता २४७ मते मिळाल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक अधिवेशनात बोलताना म्हणाले, देशातील प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी हे श्रद्धास्थान आहे. आपल्या राज्यातील एका भोंदू बाबाने त्याचे नाव कालीचरण महाराज असून तो अकोल्याचा रहिवासी आहे, त्याने आपल्या राष्ट्रपित्याला शिवीगाळ केली आहे. तुम्हाला ते सोशल मीडियावर पाहायला मिळेल. त्याने देशभर, जगभर महात्मा गांधीचा अपमान केला आहे. बापूंच्या विचाराचा विरोध होऊ शकतो. पण गेल्या काही वर्षांत त्यांच्या खुन्याचे गोडवे गायले जात आहे. विचारांची लढाई विचारांनी होऊ शकते. पण म्हणून बापूंचा अपमान होऊ शकत नाही. कालीचरण महाराजवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करा. महात्मा गांधींना शिवीगाळ, अपमान केलेले सहन करणार नाही. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.