दिव्यांग रिक्षाचालकाला आनंद महिंद्रांनी दिली ‘ही’ ऑफर


नवी दिल्ली – सोशल मीडियावर प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा प्रचंड सक्रिय असतात. त्यांची सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंवर करडी नजर असते. आनंद महिंद्रा यांनी ट्विटर अकाऊंटवर असाच एक व्हायरल व्हिडीओ शेअर केला आहे. हात आणि पाय नसलेली दिव्यांग व्यक्ती मॉडिफाईड रिक्षा चालवताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमुळे आनंद महिंद्रा खूप प्रभावित झाले आहेत.


हा व्हिडीओ शेअर करताना उद्योगपती महिंद्रा यांनी म्हटले आहे की, हा व्हिडिओ पाहून मी अवाक् झालो आहे. हे गृहस्थ शारीरिक आव्हानांना तोंड देत आहेत, परंतु निसर्गाने त्यांना जे काही दिले त्याबद्दल ते आनंदी आणि कृतज्ञ आहेत. आनंद महिंद्रा यांनी या व्यक्तीला नोकरीची ऑफर दिली आहे. या व्यक्तीबाबत माहिती गोळा करण्यासाठी त्यांनी लोकांना मदत करण्यास सांगितले आहे.

1 मिनिट 7 सेकंदांचा हा व्हिडिओ प्रोत्साहित करणार आहे. हात, पाय नसलेला हा माणूस आपली मॉडिफाईड रिक्षा रस्त्यांवर मोठ्या आत्मविश्वासाने या व्हिडीओमध्ये चालवताना दिसत आहे. या व्यक्तीचे रिक्षा चालवताना इतरांशी संभाषण सुरु आहे. आजूबाजू्च्या लोकांचे आवाज ऐकून आणि वाहनांची हालचाल पाहून असे वाटते की, ही व्यक्ती दिल्लीतच आपली रिक्षा चालवत असल्याचे कळते.