विक्रम मिसरी अजित डोवल टीम मध्ये नियुक्त

भारताचे जेम्स बॉंड अशी ओळख असलेले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्या टीम मध्ये डेप्युटी एनएसए म्हणून विक्रम मिसरी यांची नेमणूक केंद्र सरकारने केली असून ते अजित डोवल यांना रिपोर्ट करणार आहेत. मिसरी १९८९ बॅचचे आयएसएफ आहेत. शिवाय चीनची अतिशय बारीकसारीक माहिती त्यांना आहे. श्रीनगर मध्ये जन्मलेल्या मिसरी यांना जम्मू काश्मीरची नस सुद्धा चांगलीच परिचयाची आहे. चीन संदर्भात सखोल ज्ञान असलेले जे काही थोडे तज्ञ आहेत त्यात मिसरी यांचा समावेश होतो. यापूर्वी त्यांनी चीन मध्ये भारताचे राजदूत म्हणून सुद्धा जबाबदारी पेललेली आहे.

राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत मिसरी यांची सचिव म्हणून नेमणूक झाली आहे. भारत आणि चीन यांच्यातील संबध ताणले गेले असल्याच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती अतिशय महत्वाची मानली जात आहे. त्यांच्या प्रमाणेच राजेंद्र खन्ना आणि महाराष्ट्रीय दत्ता पडसलगीकर अजित डोवल यांचे सहाय्यक म्हणून काम पाहत आहेत. मिसरी यांची नियुक्ती ३१ डिसेंबर रोजी निवृत्त होत असलेल्या पंकज सरल यांच्या जागी केली गेली आहे.

विक्रम मिसरी यांचे शालेय शिक्षण जम्मू, उधमपूर येथे झाले असून त्यांनी दिल्ली विश्वविद्यापीठातून इतिहास विषयात पदवी घेतली आहे. जमशेदपूर मधून एमबीए झाल्यावर ते प्रशासकीय सेवेत १९८९ मध्ये दाखल झाले. त्यापूर्वी त्यांनी लिंटास या प्रसिद्ध जाहिरात कंपनीत काही काळ काम केले होते. माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल, मनमोहन सिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खासगी सचिव म्हणूनही त्यांनी काम केले आहे. स्पेन, म्यानमार मध्ये ते भारताचे राजदूत होते.