रतन टाटा आणि धीरूभाई अंबानी, दोघांचा आज जन्मदिवस

देशाच्या इतिहासात २८ डिसेंबरचा दिवस वेगळ्या कारणाने महत्वाचा ठरला आहे. भारतातील दोन बडे बिझिनेस टायकून धीरूभाई अंबानी आणि रतन टाटा या दोघांचा हा जन्मदिवस आहे. देशातील दोन बडे उद्योजक एकाच दिवशी वाढदिवस साजरा करतात हा अनोखा योगायोग मानला जातो. आज रतन टाटा ८३ वर्षाचे झाले तर धीरूभाई आज हयात असते तर ते ८९ वर्षाचे झाले असते. या दोघांकडून घेण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. त्याच्या यशाचे जसे भरभरून कौतुक झाले तसेच अपयशाची चर्चा सुद्धा खूप झाली आहे. दोघांचे काही निर्णय चुकले, अनेक निर्णय बरोबर आले आणि त्यातूनच त्यांचे आयुष्य घडत गेले असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

या दोघांचेही जीवन चढउतारांनी भरलेले आहे. रतन टाटा नेहमीच सांगतात, जीवनात चढ उतार येणारच त्याची सवय पाडून घ्यायला हवी. दोघांच्या जीवनात कलाटणी देणाऱ्या अनेक घटना घडल्या. रिलायंसचे शेअर पाडून कमी किमतीत पुन्हा विकत घेण्याचा ब्रोकर्सनी आखलेला डाव समजताच धीरूभाई यांनी स्वतःच ब्रोकर्स कडून आपलेच शेअर विकत घेण्याचा खेळलेला डाव त्यांना यशाच्या शिखरावर घेऊन गेला होता.

रतन टाटा यांचा सर्वात महत्वाकांक्षी प्रोजेक्ट नॅनो कार फेल गेला. १९९८ साली त्यांनी इंडिका बाजारात आणली पण हा निर्णय चुकीचा ठरला आणि अनेकांनी त्यांना कार डिव्हिजन बंद करण्याचा सल्ला दिला. रतन टाटांनी तो मान्यही केला. अमेरिकेच्या दिग्गज फोर्ड कंपनीने यात रुची दाखविली. जेव्हा टाटा बिल फोर्ड यांना भेटले तेव्हा फोर्ड यांनी टाटा यांच्यावर उपकार करतोय अशी भावना दाखविली. त्यातून नाराज झालेल्या टाटांनी हे डील मोडले आणि स्वतः कारवर काम सुरु करून टाटाला यशस्वी कार ब्रांड बनविले. ९ वर्षानंतर म्हणजे २००८ साली फोर्ड दिवाळखोरीत निघाली तेव्हा रतन टाटा यांनी त्यांच्या लग्झरी जग्वार लँडरोव्हरची खरेदी केली तेव्हा बिल यांनी त्यांना धन्यवाद दिले होते.