टेस्लाच्या एलोन मस्कचा जुळा चिनी?

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, टेस्ला आणि स्टार लिंकचे सीईओ एलोन मस्क जगभरात चांगलीच प्रसिद्धी मिळवून आहेत आणि या ना त्या कारणाने सतत चर्चेत असतात. नुकतेच मस्क पुन्हा एकदा हेडलाइन्स मध्ये झळकले आहेत ते त्यांनी दिलेल्या एका प्रतिक्रियेमुळे. डेली स्टारच्या रिपोर्ट नुसार मस्क यांचा हूबहु म्हणजे डिटटो मस्क वाटेल, अश्या एका व्यक्तीचा व्हायरल झालेला व्हिडीओ त्यासाठी कारणीभूत ठरला आहे.

चीनच्या शुझोऊ भागात राहणाऱ्या यी लोंग नावाच्या व्यक्तीचा फोटो आणि छोटा टिकटॉक व्हिडीओ इंटरनेट वरील सर्व सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालतो आहे. या फोटोतील व्यक्ती हुबेहूब मस्क सारखी दिसते आहे. हे साम्य इतके आहे कि खुद्द मस्क सुद्धा फसतील. ट्वीटर वर मस्क यांना युजर्सनी टॅग केल्यावर मस्क यांनी त्यावर अपेक्षेनुसार प्रतिक्रिया दिली आहे. मस्क प्रतिक्रिया देताना म्हणतात,’ मी कदाचित थोडा चीनी आहे.’

मस्क यांचा हा हूबहु, विशेष म्हणजे टेस्लाच्या काळ्या रंगाच्या कार समोर उभा राहून हसताना दिसतो आहे. त्याचे हसणे, चेहऱ्यावरचे हावभाव तंतोतंत मस्क यांच्यासारखे आहेत. त्याची हेअरस्टाईल सुद्धा मस्क यांच्या सारखी आहे. फक्त व्हिडीओ मध्ये बोलताना तो चीनी भाषा बोलतो आहे. युजर्स त्याला मस्क यांचा क्लोन, चायनिज मस्क म्हणत आहेत. असाही दावा केला जातोय कि हा व्हिडीओ फेक आहे. तर काहींच्या म्हणण्यानुसार यी लोंग याने एलोन मस्क यांच्यासारखे दिसावे म्हणून एआय फेस स्वॅप तंत्रज्ञानाचा आधार घेऊन चेहरा रिप्लेस केला आहे. पण यी लोंग याने या आरोपाला उत्तर म्हणून त्याचा लाइव व्हिडीओ शेअर केला आहे.