पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात नवी मजबूत मर्सिडीज एस ६५० गार्ड दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा वाहन ताफ्यात आता बुलेटप्रुफ, बॉम्बप्रुफ, अतिशय मजबूत लग्झरी मर्सिडीज मेबॅक एस ६५० गार्ड दाखल झाल्याची पुष्टी झाली आहे. सर्वप्रथम रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन भारतात आले असताना त्याच्या भेटीसाठी हैद्राबाद हाउसवर मोदी या नव्या कार मधून आल्याचे दिसले होते, त्यानंतर पुन्हा एकदा याच गाडीतून प्रवास करताना त्यांना पाहिले गेले आहे.

यापूर्वी पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षा वाहन ताफ्यात रेंजरोव्हर वोग, टोयाटो लँडक्रुझर या कार्स होत्या. अतिमहत्वाच्या व्यक्तींना असलेला धोका लक्षात घेऊन त्यांच्यासाठी कोणते वाहन निवडायचे याचा निर्णय एसपीजी म्हणजे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप कडून घेतला जातो. यावेळी त्यांनी मर्सिडीज मेबॅक एस ६५० गार्डची निवड केली आहे. ही कार गतवर्षी भारतात १०.५ कोटी किमतीला लाँच केली गेली होती. पंतप्रधानांसाठी घेतलेल्या कारची किंमत १२ कोटी असल्याचे समजते. अत्याधुनिक प्रोटेक्शन सिस्टीम हीच या कारची खासियत आहे.

या कारला ६.० लिटरचे ट्वीन टर्बो व्ही १२ इंजिन आहे. खिडक्यांना अतिशय मजबूत बुलेट प्रुफ काचा आहेत. एक्सप्लोजन प्रुफ वाहनाचे रेटिंग या कारला दिले गेले असून १५ किलो टीएनटी स्फोटके दोन मीटर अंतरावरून उडविली गेली तरी कारचे काहीही नुकसान होत नाही. कारचा खालचा तळ मजबूत धातूपासून बनविला गेला आहे. तसेच गॅस अॅटॅक झालाच तर केबिन मध्ये हवेचा वेगळा पुरवठा करता येतो. इंधन टाकी विशेष मटेरीयल पासून बनविली गेली असून त्याला भोके पडली तर अपोआप सील केली जातात. ही कार टायर फ्लॅट झाले तरीही धावू शकते.

नरेंद्र मोदी गुजराथचे मुख्यमंत्री असताना महिंद्राची बुलेटप्रुफ स्कॉर्पियो वापरत होते. २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यावर त्यांनी प्रथम बीएमडब्ल्यू ७ कार वापरली होती.