नागपूरात झाली देशातील पहिल्या LNG नॅचरल गॅसवर चालणाऱ्या बसची निर्मिती


नागपूर : देशातील पहिली एलएनजी म्हणजेच लिक्विडीफाईड नॅचरल गॅसवर (LNG) चालणारी बस प्रदूषण मुक्त भारत या मोहिमेअंतर्गत नागपुरात तयार करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यातील मासाळ येथे लवकरच बायो एलएनजी प्लांट, तर नागपूर आणि रायपूर येथे एलएनजी स्टेशन उभारून मध्यभारतात एलएनजीची उपलब्धता कमालीची वाढणार आहे.

मुळात महिंद्रा कंपनीची ही बस डिझेलवर चालणारी होती. पण डिझेलवर चालणाऱ्या या बसला “गो बस’ या कंपनीने एलएनजी वर चालणाऱ्या बसमध्ये रूपांतरित केले आहे. यासाठी सुमारे अकरा लाख रुपयांचा खर्च आला आहे. डिझेलऐवजी एलएनजी वर चालणाऱ्या बसमुळे इंधनावर लागणारा खर्च अनेक पटींनी कमी होईल, असा कंपनीचा दावा आहे. सध्या नागपुरात सुरू असलेल्या ऍग्रो व्हिजन या कृषी प्रदर्शनात ही बस लोकांच्या आकर्षणाचा केंद्र ठरत आहे.

विशेष म्हणजे मानस ऍग्रो आणि लिफिनिटी बायो एनर्जी यांच्यात या कृषी प्रदर्शनात सामंजस्य करार झाला, असून त्याअंतर्गत भंडारा जिल्ह्यातील मासाळ याठिकाण बायो एलएनजी प्लांट उभारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रात नागपूर आणि छत्तीसगडमधील रायपूर येथे हे एलएनजी स्टेशन उभारण्यात येणार असल्याने मध्य भारतात आता एलएनजी इंधनाची उपलब्धता कमालीची वाढणार आहे. त्यामुळे भविष्यात विदर्भात डिझेल ऐवजी एलएनजी सारख्या बायो इंधनावर ट्रक आणि बसचे परिचालन वाळून इंधनाची बचत यासह प्रदूषण कमी करण्यास मोठी मदत होणार आहे.