चंद्रकांत पाटलांच्या महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याच्या दाव्यावर शरद पवार म्हणाले…


मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकरारी राज्य सरकार स्थिर ठेवण्यात यशस्वी झाले आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी यावेळी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असे म्हणणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना शरद पवारांनी टोला लगावला आहे. नवीन वर्षात त्यांना माझ्या शुभेच्छा असल्याचे शरद पवार म्हणाले आहेत.

रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार साता-यात आले होते. त्यावेळी त्यांच्यासमवेत खासदार श्रीनिवास पाटील आदी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल अशी शक्यता चंद्रकांत पाटील यांना वर्तवली आहे, असे सांगण्यात आले असता ते म्हणाले की, नवीन वर्षात त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. राज्यामध्ये, विधिमंडळात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्पष्ट बहुमत आहे. राज्य सरकार स्थिर ठेवण्यात उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी यशस्वी झाल्यामुळे जे लोक अस्वस्थ असतात ते अशा प्रकारची वक्तव्य करत असतात, असा टोला शरद पवारांनी लगावला.

याआधीही अशा प्रकारची त्यांनी वक्तव्ये केली आहेत. त्याची नोंद महाराष्ट्रात सामान्य लोक घेत नाहीत. त्याचा काही फायदा होत नाही. त्यामुळे त्यावर अधिक भाष्य करण्यास इच्छुक नाही, असे सांगत त्यांनी जास्त महत्व देण्यास नकार दिला.

राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी दोन वेळा निवडणुकीच्या तारखा दिल्यानंतरही महाविकास आघाडी सरकारने निवडणूक घेतली नाही हा राज्यपालांचा आणि घटनेचा अवमान आहे आणि याच एका मुद्द्यावर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.