प्रकाश आंबेडकरांबाबत पुण्यात रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य


पुणे : १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे ‘शौर्य दिवस’ साजरा केला जातो. विजयस्तंभाला वंदन करण्यासाठी या दिवशी राज्यभरातून लोक येत असतात. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या पार्श्वभूमीवर पुणे येथील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांची नियोजन बैठक बोलावली होती. आठवले यांनी या बैठकीनंतर पत्रकार परिषद देखील घेतली. कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन यावेळी आठवले यांनी केलं. तसेच रिपब्लिकन ऐक्यावरही त्यांनी भाष्य केले आहे.

दरम्यान अनेक वेळा रामदास आठवले आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर या दोन नेत्यांमध्ये राजकीय संघर्ष होताना पाहायला मिळतो. पण आज आठवले यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. प्रकाश आंबेडकर यांना बाजूला ठेवून रिपब्लिकन ऐक्य होऊ शकते, असे मत जेष्ठ नेते जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केले आहे. पण, प्रकाश आंबेडकर यांना बरोबर न घेता रिपब्लिकन ऐक्य होऊ शकणार नसल्याचे मत आठवले यांनी व्यक्त केले आहे.

२०१८ साली भीमा कोरेगाव येथे झालेल्या संघर्षानंतर कार्यकर्त्यांविरुद्ध दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार आहे; तसेच कोरेगाव भीमा विजयस्तंभ येथे पोलीस मानवंदना द्यावी, अशीही मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे या पत्रकार परिषदेत रामदास आठवले यांनी सांगितले आहे.

विजयस्तंभ परिसराचा सुमारे १०० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी असलेली सुमारे २० हेक्टर म्हणजे ५० एकर जमिनीचे भूसंपादन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना केली आहे. संबंधित जमीन मालकांना दुसऱ्या ठिकाणी जमीन द्यावी, असे देखील सुचवले आहे. राज्याचा पर्यटन विभाग आणि केंद्रीय पुरातत्त्व विभाग यांच्याकडूनही या परिसराच्या विकासासाठी निधी मिळविण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याद्वारे या ठिकाणी भव्य स्मारक उभे राहू शकेल, अशी माहितीही यावेळी आठवले यांनी दिली.