दिल्ली आणि हरिद्वार येथे नरसंहारासाठी चिथावणीखोर भाषणे; सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांचे सरन्यायाधीशांना पत्र


नवी दिल्ली – दिल्ली आणि हरिद्वार येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या धार्मिक संघटनांच्या कार्यक्रमात देण्यात आलेल्या चिथावणीखोर भाषणांवर सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांनी चिंता व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयातील जवळपास 76 वकिलांनी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांना पत्र लिहिले आहे. सरन्यायाधीशांनी स्वत: हून या प्रकरणात दखल द्यावी, अशी मागणी वकिलांनी केली आहे.

ही चिथावणीखोर भाषणे दिल्लीमध्ये हिंदू युवा वाहिनी आणि उत्तराखंड येथील हरिद्वारमध्ये यती नरसिंहानंद यांनी आयोजित केलेल्या धर्मसंसदेत करण्यात आली आहे. 17 आणि 19 डिसेंबर 2021 रोजी हे दोनही कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या भाषणांमध्ये अल्पसंख्याकांच्या नरसंहारासाठी चिथावणी देण्यात आली होती.

सोशल मीडियावर धर्म संसदेत साधू-संतांच्या हिंदुत्व आणि मुस्लिमांबाबत केलेल्या वादग्रस्त भाषणांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. संत आणि धर्मगुरूंनी या व्हिडिओंमध्ये धर्माच्या रक्षणासाठी शस्त्र उचलणे, मुस्लिमांना पंतप्रधान होऊ न देणे, मुस्लिमांची लोकसंख्या वाढू न देणे, शैक्षणिक पुस्तके सोडून देणे आणि शस्त्रे हाती घेण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.

व्हायरल व्हिडिओनुसार, यति नरसिंहानंद म्हणाले, आता आर्थिक बहिष्कार चालणार नाही. हिंदूंनी तलवारींबद्दल विसरून जा. तलवारी रंगमंचावरच छान दिसतात. उत्तम शस्त्रे असलेले लोकच ही लढाई जिंकतील. अधिकाधिक मुले आणि चांगली शस्त्रे तुम्हाला वाचवतील.

अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचार भडकवण्यासाठी द्वेषयुक्त भाषणे हरिद्वार येथे आयोजित ‘धर्म संसद’मध्ये केल्याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पण, या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.