महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्यानंतर कालीचरण महाराजांकडून नथुरामचे कौतुक


रायपूर : कालीचरण महाराज यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूर येथे आयोजीत करण्यात आलेल्या धर्मसंसदेत अपशब्द वापरले आहेत. कालीचरण महाराज यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांच्याविरोधात काँग्रेससह इतर सामाजिक संघटनांनी गुन्हा दाखल केला आहे. कालीचरण यांच्याविरोधात रायपूरमधील काँग्रेसच्या नेत्यांनी तक्रार दाखल केली असून, त्यांच्याविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

देशातील वेगवेगळ्या राज्यात सध्या हिंदू धर्मसंसदेचे आयोजन करण्यात येत आहे. या धर्मसंसदेतून अनेक वादग्रस्त वक्तव्य समोर येत आहेत. अशातच आता कालीचरण महाराज यांनीही वादग्रस्त वक्तव्य करुन नव्या वादाला तोंड फोडले आहे. सध्या सोशल मीडियावर कालीचरण महाराज यांचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

राजकारणाच्या माध्यमातून मुस्लिम हे देशावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी १९४७ मध्ये आपल्या डोळ्यासमोरच देशावर ताबा मिळवला होता. त्यांनी प्रथम इराण, इराक आणि अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. तसेच त्यांनी राजकारणाच्या माध्यमातून पाकिस्तान आणि बांगलादेशवरही कब्जा केला आहे. नथूराम गोडसे यांना मी सलाम करतो की त्यांनी महात्मा गांधींची हत्या केल्याचे वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केले आहे.

कालीचरण महाराज यांनी यावेळी बोलताना छत्तीसगडमधील काँग्रेस सरकावरही जोरदार निशाणा लगावला. धर्माची रक्षा करण्यासाठी कट्टर हिंदू नेत्यालाच सरकारचा प्रमुख करायला हवे. पोलीस प्रशासनाचे छत्तीसगडमधील सरकार हे गुलाम आहेत. त्यामुळे याठिकाणी कट्टर हिंदू नेता मुख्यमंत्री होणे गरजेचे असल्याचे कालीचरण महाराज म्हणाले. हिंदू धर्माचे रक्षण करणे हेच आमचे कर्तव्य असल्यामुळे सरकारमध्ये एक कट्टर हिंदू राजा निवडणे गरजेचे आहे.