मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा राज्यात निर्बंध लावल्यानंतर महत्वाचा आदेश


मुंबई – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि तो रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्याची गरज असून आगामी काळात आपल्याला अधिक दक्षता बाळगून काटेकोर पाऊले उचलावी लागणार असल्याचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. टास्क फोर्सची बैठकही येत्या एक दोन दिवसांत आयोजित करावी, असेही त्यांनी निर्देश त्यांनी दिले आहेत.

राज्य मंत्रिमंडळाच्या सोमवारी पार पडलेल्या बैठकीत वाढत्या संसर्गावर चिंता व्यक्त करण्यात आली. आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी यावेळी सादरीकरणात जानेवारीच्या मध्याला कोरोनाच्या सक्रिय रुग्णात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली असून लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज असल्याचे सांगितले. आपण काही दिवसांपूर्वी दिवसाला आठ लाख डोसेस देत होतो, सध्या दिवसाला पाच लाख डोसेस दिले जात आहेत.

सर्व पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करून आपापल्या जिल्ह्यांत लसीकरण वेगाने होईल, असे पाहण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. डॉ व्यास यांनी यावेळी अधिक माहिती देताना सांगितले की, ८ डिसेंबरला ६२०० सक्रिय रुग्ण होते. पण आज १० हजार सक्रिय रुग्ण आहेत. एकूणच गेल्या २० दिवसांत सक्रिय रुग्णांमध्ये ५० टक्के वाढ झाली असून मागील सहा दिवसांत रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली. राज्यात पॉझिटिव्हिटी रेट १.०६ टक्के झाल्याचेही ते म्हणाले आहेत.

कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि ओमिक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव यामुळे गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्यात काही नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

विवाहसोहळे, धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांमध्ये उपस्थितीवर नियंत्रण आणण्यात आले आहे. उपाहारगृहे, चित्रपट व नाट्यगृहे, व्यायामाशाळांमध्ये ५० टक्के उपस्थितीचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. नाताळ, नववर्ष समारंभ साजरे करताना गर्दी होऊ नये, यासाठीच ही खबरदारी घेण्यात आली आहे. नवे निर्बंध शुक्रवारी मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. या कालावधीत पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र बाहेर पडता येणार नाही वा एकत्र जमता येणार नाही.