बूस्टर डोससाठी केंद्र सरकारकडून कॉकटेल लशीच्या पर्यायाची चाचपणी


नवी दिल्ली – 10 जानेवारीपासून भारतात बुस्टर डोस देण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. तेव्हापासूनच बुस्टर डोसबाबत देशातील नागरिकांकडून अनेक प्रश्न विचारले जात आहेत. बुस्टर डोस किती दिले जाणार? कोणत्या लसीचा दिला जाणार? यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 10 जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी आणि 60 वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना प्रिकॉशन डोस देण्यात येणार आहे. पण लस देताना सरकार एक खास प्लान राबवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एखाद्या व्यक्तीला लसीचे पहिले दोन डोस एका व्हॅक्सिनचे देण्यात आले असतील, तर तिसरा म्हणजेच, बुस्टर डोस त्याच व्हॅक्सिनचा देण्यात येणार नाही. तो दुसऱ्या व्हॅक्सिनचा देण्यात येणार आहे किंवा त्यासाठी कॉकटेल लशीच्या पर्यायाची चाचपणी करण्यात येत आहे.

भारतात बुस्टर डोस, अर्थात कोरोना प्रतिबंधक लशीच्या तिसऱ्या डोसचे वितरण 10 जानेवारीपासून सुरु होणार आहे. पण ज्या लशीचे दोन डोस तुम्ही घेतले आहेत. तिच लस बुस्टर डोस म्हणून दिली जाण्याची शक्यता कमी आहे. कारण बूस्टर डोससाठी केंद्र सरकारकडून कॉकटेल लशीच्या पर्यायाची चाचपणी केली जात आहे. कॉकटेल अर्थात दोन वेगवेगळ्या लशींचे डोस अधिक परिणामकारक असल्याचे एका अभ्यासानंतर समोर आले आहे. या संदर्भातील अहवाल अजून प्रसिद्ध व्हायचा आहे.

इंग्रजी वृत्तपत्र इकॉनॉमिक टाईम्सला एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एखाद्या व्यक्तीला जर त्याने आधी घेतलेल्याच लसीचा बुस्टर डोस दिला, तर तो तेवढा परिणामकारक ठरत नाही. पण कॉकटेल अर्थात दोन वेगवेगळ्या लशींचे डोस अधिक परिणामकारक असल्याचे अभ्यासात दिसून आलं आहे. अधिकाऱ्यांनी पुढे म्हटले आहे की, जर सरकारने डोस मिक्सिंगला परवानगी दिली, तर सीरम इन्स्टिट्यूटचे कोवोव्हॅक्स (नोव्हावॅक्सचा भारतीय ब्रँडचे नाव) हे पूर्वी कोव्हिशिल्ड मिळालेल्या लोकांसाठी बूस्टर डोससाठी वापरले जाऊ शकते.