आमदार नितेश राणेंच्या यांच्या अटकेची चर्चा; नागपुरातील कार्यक्रम अर्धवट सोडून नारायण राणे मुंबईला रवाना!


नागपूर : नागपुरातील कार्यक्रम अर्धवट सोडून केंद्रीय मंत्री नारायण राणे मुंबईकडे रवाना झाले आहेत. आमदार नितेश राणे यांच्या अटकेच्या चर्चेने जोर धरलेला असताना त्यांनी मुंबईकडे रवाना झाल्याची चर्चा आहे. नारायण राणे यांनी नागपुरातील कृषी प्रदर्शनात उपस्थिती लावली होती. हाच कार्यक्रम अर्धवट सोडून राणे मुंबईकडे रवाना झाले आहेत.

कणकवली पोलिसांच्या संतोष परब हल्लाप्रकरणी कारवाईला वेग आल्यानंतर आता भाजप आमदार नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिन अर्ज दाखल केला आहे. नितेश राणे यांनी त्याअगोदर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरुन चर्चा केली.

आतापर्यंत पाच आरोपींना संतोष परब हल्लाप्रकरणी अटक करण्यात आली आहे, तर हल्ल्याचे मुख्य सुत्रधार असा नितेश राणे यांच्यावर आरोप आहे. दुसरीकडे नितेश राणे यांच्या अटकेसाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी कणकवली पोलिस स्टेशनवर मोर्चा काढत नितेश राणे यांना कोणत्याही परिस्थितीत अटक करा, अशी मागणी केली आहे.

दुसरीकडे शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी विधान सभेतही अतिशय आक्रमक होत नितेश राणे यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. कणकवली पोलिसांकडून या सगळ्या घटनेनंतर नितेश राणे यांचा शोध सुरु आहे. आज विधिमंडळात अधिवेशनाला नितेश राणे यांनी दांडी मारली. त्यांनी आज अधिवेशन कामकाजात सहभाग घेतला नाही. त्यांचा फोनही नॉट रिचिबल होता. दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास त्यांची फडणवीसांशी फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.