अॅशेस ; इंग्लंडच्या सपोर्ट स्टाफसह चौघांना कोरोनाची लागण


नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड अॅशेस मालिकेवर कोरोनाचे सावट असून अॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्याचा दुसऱ्या दिवसाचा खेळ अर्धा तास उशिरा सुरू झाला. इंग्लंड संघाच्या सपोर्ट स्टाफमधील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे सामना सुरू होण्यापूर्वी स्पष्ट झाले. तर, खेळाडूंच्या कुटुंबातील दोघांना कोरोनाची लागण झाली. इंग्लंड क्रिकेट संघाच्या तंबूत कोरोनाने शिरकाव केल्यामुळे खळबळ उडाली आहे. कोरोनाबाधितांची नावे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केली नाहीत.

कोरोनाने इंग्लंडच्या तंबूत शिरकाव झाल्याचे समोर आल्यानंतर सर्व खेळाडूंची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. सर्व खेळाडूंचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर सामन्यास सुरुवात करण्यात आली. मागील काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. वाढत्या कोरोना संसर्गामुळे ऑस्ट्रेलियात उपाययोजना आखल्या जात आहेत. अॅशेस मालिकेतही खबरदारी बाळगली जात असताना कोरोनाने शिरकाव केला आहे. इंग्लंड संघाशी संबंधित चौघांना कोरोनाची लागण झाली. तर, दुसरीकडे अॅशेस मालिकेच्या टीव्ही प्रक्षेपण करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोनाच्या संकटामुळे अॅशेज मालिकेतील पाचव्या सामन्याचे ठिकाण बदलावे लागले आहे. 14 जानेवारीपासून होबार्टमध्ये शेवटचा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना दिवस-रात्र असणार आहे. याआधी हा सामना पर्थमध्ये होणार होता. पण, पश्चिम ऑस्ट्रेलियात कोरोनाशी निगडित नियम आणि इतर कारणांमुळे सामन्याचे आयोजन पर्थ ऐवजी इतर ठिकाणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.