जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी ब्रिटनच्या महाराणीची हत्या करण्यासाठी राजवाड्यात दाखल झाला युवक


ब्रिटन – एका भारतीय वंशाच्या शीख युवकाने जालियनवाला हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या राजवाड्यात धनुष्य बाण घेऊन प्रवेश केला. ख्रिसमस साजरा करण्यासाठी ब्रिटीश राणी एलिझाबेथ विंडसर कॅसल येथे पोहोचल्या आहेत. जसवंत सिंह चैल असे या हल्लेखोराचे नाव असून तो 19 वर्षांचा आहे. जसवंत सिंह वर्ष 1919 मधील अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी ब्रिटनच्या राणीला ठार करण्यासाठी आला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला मानसिक आरोग्य कायद्यान्वये पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

यासंदर्भात ‘द सन’ने दिलेल्या वृत्तानुसार, त्याच्या मानसिक आरोग्याची तपासणी लंडन पोलिसांकडून करण्यात येत आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली जसवंत सिंह याला ठेवण्यात आले आहे. जसवंत सिंहचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये संशयित हल्लेखोर जसवंत सिंहकडे धनुष्य बाण असल्याचे दिसत आहे. जसवंत सिंहने ख्रिसमसच्या दिवशी सकाळी 8:06 वाजता स्नॅपचॅटवर एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्याला विंडसर कॅसलमधून ताब्यात घेण्यात आले आहे.

जसवंतने व्हिडिओत आवाज लपवण्यासाठी फिल्टरचा वापर केला होता. त्याने हुडी आणि मास्क घातला होता. त्याची वेशभूषा ‘स्टार वॉर’ या चित्रपटापासून प्रेरित असल्याचे दिसते. तो व्हिडिओमध्ये म्हणाला की, मला माफ करा. मी जे करणार आहे, त्याबद्दल मला क्षमा करा. महाराणी एलिझाबेथला मारण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्याने व्हिडिओत म्हटले. वर्ष 1919 मध्ये झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडात ठार झालेल्या नागरिकांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हे पाऊल उचलत असल्याचे त्याने व्हिडिओत सांगितले.