बॉलीवूड कलाकार विवाह समारंभ उपस्थितीतून करतात करोडोंची कमाई

दबंग खान अशी ओळख असलेल्या सलमानने माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे चिरंजीव प्रजय यांच्या विवाहात उपस्थिती लावली, इतकेच नव्हे तर डान्स ही केल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. सलमानचे चाहते मात्र प्रजय ना सलमानच्या नात्याचा, ना गोत्याचा मग सलमानने आनंदाने,उत्साहाने डान्स का केला असेल या गोंधळात पडले आहेत. बॉलीवूड कलाकार घरे घेऊन आणि ती भाड्याने देऊन कोट्यावधींची कमाई दरवर्षी करतात हे आता नवीन राहिलेले नाही. त्याचप्रमाणे हे बॉलीवूड कलाकार एखाद्या विवाह समारंभात किंवा एखाद्या कार्यक्रमात उपस्थिती लावून करोडो रुपयांची कमाई करतात याची अनेकांना माहिती नसेल. म्हणजे कोणत्याही खासगी समारंभातील कलाकारांची ही उपस्थिती पेड म्हणजे पैसे आकारून केलेली असते.

या बाबत बॉलीवूड अभिनेत्यांपेक्षा अभिनेत्री कतरिना सर्वात जास्त पैसे आकारणारी कलाकार आहे. अश्या कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी कतरिना साडेतीन कोटी रुपये घेते असे सांगितले जाते. किंग खान शाहरुख याच कारणासाठी ३ कोटी घेतो तर खिलाडी अक्षयकुमार सर्वाधिक व्यग्र कलाकार असूनही मुद्दाम वेळ काढतो आणि उपस्थितीसाठी अडीच कोटी रुपये घेतो असे सांगितले जाते.

निक जोनासची विवाह करून ग्लोबल स्टार बनलेली प्रियांका चोप्रा याच कारणासाठी अडीच कोटी रुपये घेते. प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या कन्येच्या म्हणजे इशा अंबानीच्या लग्नात प्रियांका उदयपुरला उपस्थित राहिली होती. हृतिक रोशन खासगी कार्यक्रम उपस्थितीसाठी अडीच कोटी घेतो तर रणबीर कपूर २ कोटी घेतो.

सलमान खान हा स्वतःच एक ब्रांड आहे. तो कार्यक्रम उपस्थितीसाठी २ कोटी घेतो तर अतिउत्साही व्यक्तीमत्वाचा अभिनेता रणवीरसिंग व त्याची पत्नी अभिनेत्री दीपिका या साठी प्रत्येकी १ कोटी रुपये आकारतात. अनुष्का या बाबत सर्वात कमी पैसे घेते. ती फक्त ८० लाखात खासगी कार्यक्रम, विवाहात उपस्थिती लावते.