ओमिक्रोनचा वाढता धोका, इस्रायल जेष्ठ नागरिकांना देणार लसीचा चौथा डोस

करोनाचे नवे व्हेरीयंट ओमिक्रोनने इस्रायल मध्ये पहिला बळी घेतला आहे. ओमिक्रोनचा  वाढता धोका लक्षात घेऊन इस्रायलचे पंतप्रधान नाफ्ताली बेनेट यांनी ज्येष्ठ नागरिकांना कोविड १९ लसीचा चौथा डोस देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. बेनेट म्हणाले, ६० वर्षावरील ज्या नागरिकांना कोविड लसीचा तिसरा डोस मिळाला आहे,त्यांना चौथा डोस देत आहोत.

इस्रायलमध्ये ज्या जेष्ठ नागरिकाचा ओमिक्रोन मुळे मृत्यू झाला त्याला इतर अनेक व्याधी होत्या. सोरोका मेडिकल सेंटरकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार ६० वर्षाची ही व्यक्ती दोन आठवड्यापूर्वी रुग्णालयात दाखल झाली होती. त्यांनी लसीचे दोन डोस घेतले होते पण त्यांना अन्य अनेक आजार होते. देशात सध्या ओमिक्रोनचे ३४० अधिकृत संक्रमित असून सरकारने अगोदरच सरकारी कार्यालयात कर्मचारी उपस्थिती ५० टक्क्यांवर आणली आहे.

संरक्षण मंत्रालयाने ते कोणतीही परिस्थिती निपटण्यास सज्ज असल्याचे जाहीर केले असून दररोज ५ हजार केसेस आल्या तरी तयारी असल्याचे म्हटले आहे. जगात आजपर्यंत अनेक देशांना कोविड लसीचा पहिला डोस सुद्धा मिळालेला नाही. मात्र इस्त्रायलने आत्ताच २८ लाख लोकांना बुस्टर डोस दिला आहे. देशाची लोकसंख्या कमी असल्याने हे शक्य झाल्याचे सांगितले जात आहे. २०१९ च्या गणनेनुसार देशाची लोकसंख्या ९० लाख ५० हजार आहे. आरोग्य मंत्रालयाचे प्रमुख नचमन यांनी करोनाच्या नव्या व्हेरीयंटचा धोका लक्षात घेऊन ऑगस्ट २०२१ पासूनच देशात बुस्टर डोस दिले जात असल्याचे सांगितले आहे.