स्मृती इराणी आता खऱ्या सासूच्या भूमिकेत जाणार

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी प्रसिद्धीच्या झोतात प्रथम आल्या त्या टीव्ही वरील ‘सास भी कभी बहु थी’ या सिरीयल मधील सून ‘तुलसी’ च्या भूमिकेमुळे. आत्ता ही लोकप्रिय बहु खऱ्या आयुष्यात सासू बनत असून त्या संदर्भात स्मृती यांनी त्यांच्या इस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. कन्या शॅनेल हिच्या साखरपुड्याचे ते फोटो आहेत.

स्मृती इराणी यांनी लेक शॅनेल, आणि तिचा दीर्घ काळाचा मित्र अर्जुन भल्ला यांच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करताना कॅप्शन मध्ये जावयाला इशारा सुद्धा दिला आहे. त्या लिहितात,’ ही पोस्ट त्या व्यक्तीसाठी आहे, ज्याने आमचे हृदय जिंकले आहे. आमच्या क्रेझी कुटुंबात तुमचे स्वागत. येथे एका क्रेझी व्यक्तीबरोबर तुमची भेट होणार आहे जो तुमचा सासरा आहे. इतकेच नाही तर माझ्यासारख्या खाष्ट सासूबरोबर तुमचा सामना आहे  याची ऑफीशीयल वॉर्निंग आहे. गॉड ब्लेस शॅनेल.’ २५ डिसेंबरला हा साखरपुडा पार पडला आहे.

शॅनेल, इराणी यांची पहिली पत्नी मोना यांची मुलगी असून स्मृती यांना जोहर आणि जोईश अशी दोन मुले आहेत. शॅनेल पेशाने वकील आहे. त्यांनी वकिलीचे उच्चशिक्षण अमेरिकेत घेतले आहे. स्मृती यांनी जावई अर्जुन विषयी काहीच माहिती शेअर केलेली नाही.