शाओमीच्या इलेक्ट्रिक कारची प्रतीक्षा

भविष्यात इलेक्ट्रिक कारची मागणी वाढत जाणार याचा स्पष्ट अंदाज आल्याने अनेक इलेक्ट्रिक स्टार्टअप कंपन्या जश्या वेगाने सुरु होत आहेत तसेच अनेक टेक कंपन्यासुद्धा या क्षेत्रात एन्ट्रीसाठी सज्ज झाल्या आहेत. चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमी बरोबरच ओप्पो, रियलमी, अॅपल, वनप्लस इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहेत. इलेक्ट्रिक कार, स्कूटर अश्या विविध प्रकारची इलेक्ट्रिक वाहने त्यामुळे भविष्यात बाजारात येणार आहेत. त्यात सर्वाधिक प्रतीक्षा होते आहे शाओमीच्या पहिल्या इलेक्ट्रिक कारची.

स्मार्टफोन बाजारात शाओमीचे वर्चस्व आहे आणि तरीही अन्य कंपन्यांच्या तुलनेत त्यांचे फोन स्वस्त आहेत. त्यामुळे ग्राहकांना शाओमीची पहिली इलेक्ट्रिक कार सुद्धा तुलनेने स्वस्त असेल अशी अपेक्षा आहे. काही दिवसापूर्वीच शाओमी ईव्ही नावाने कारचे रजिस्ट्रेशन केले आहे. ओप्पो, रियलमी, वनप्लसने सुद्धा रजिस्ट्रेशन साठी अर्ज केल्याचे सांगितले जात आहे. टेस्ला भारतात प्रवेश व्हावा यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे.

या पार्श्वभूमीवर शाओमीने केलेल्या घोषणेनुसार पुढच्या १० वर्षात कंपनीने इलेक्ट्रिक वाहन ऑपरेशन, उत्पादन, विकास योजनेवर १० अब्ज डॉलर्स खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. शाओमीची पहिली ईव्ही सेदान किंवा एसयुव्ही सेग्मेंट मधील असेल असे सांगितले जात आहे. भारतात इलेक्ट्रिक कार मागणी वेगाने वाढते आहे. महिंद्रा, टाटा कंपन्या आक्रमक झाल्या असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे २०२२ पासून अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कार्स भारतीय रस्त्यांवर धावताना दिसतील. भारत सरकार त्यासाठी योग्य वातावरण तयार करत असल्याचेही सागितले जात आहे.