ज्येष्ठ नागरिकांना कोविड बुस्टरडोस साठी द्यावे लागणार व्याधीसंदर्भातले प्रमाणपत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशात १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या कोविड लसीकरणाला तसेच अन्य आजार असलेले जेष्ठ नागरिक व फ्रंट लाईन वर्कर्सना बुस्टर डोस देण्यात येण्याची घोषणा केली आहे. मात्र प्रथम अन्य गंभीर आजार असलेल्या जेष्ठ नागरिकांनाच बुस्टर डोस साठी प्राधान्य दिले जाणार असून त्यासाठी त्यांना नोंदणीकृत डॉक्टरकडून आजारासंबंधीचे प्रमाणपत्र सोबत आणावे लागणार आहे. कोविन संचालन प्रमुख व नॅशनल हेल्थ अॅथॉरीटीचे सीईओ डॉ. आर. एस शर्मा यांनी या संदर्भात माहिती दिली.

डॉ. शर्मा म्हणाले, बुस्टर डोसची प्रक्रिया लसीकरणासाठी केलेल्या अगोदरच्या प्रक्रीयेप्रमाणेच आहे. त्या संदर्भात कोविन वर सर्व माहिती दिली गेली आहे. ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस घेण्यासाठी त्यांना असलेल्या अन्य आजारासंदर्भातले प्रमाणपत्र डॉक्टर कडून आणावे लागेल तसेच नोंदणीकृत डॉक्टरची त्यावर सही असायला हवी. मगच त्यांना बुस्टर डोस दिला जाणार आहे. हे प्रमाणपत्र कोवीन वर अपलोड करता येईल. लसीकरण केंद्रावर त्याची हार्डकॉपी नेता येईल. अन्य आजार म्हणजे कुठले याचा तपशील ४५ वयोगटाच्या वरील लोकांचे लसीकरण सुरु केले गेले तेव्हाच दिला गेला असल्याचे त्यांनी सांगितले. तेच नियम आता लागू राहणार आहेत.

अन्य आजारात २० आजारांची यादी दिली गेली आहे. त्यात मधुमेह, डायलिसीस, किडनी विकार, कार्डीओव्हसक्यूलर डिसीज, स्टेमसेल ट्रान्सप्लांट, कॅन्सर, सिरोसीस, सिकल सेल, दीर्घ काळ स्टेरोईड किंवा इम्युनोसप्रेसंट औषधांचा वापर, श्वास रोग, मदतीची आवश्यकता असलेले अपंग, मस्क्युलर डीस्ट्रोफी अश्या आजारांचा समावेश आहे. १० जानेवारी पासून बुस्टर डोस दिले जाणार आहेत.