योगी पुन्हा मठात आणि मोदी हिमालयात जातील, तेव्हा तुम्हाला कोण वाचवणार? ओवेसी यांचा पोलिसांना धमकीवजा इशारा


लखनौ – सध्या सोशल मीडियात एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी पोलिसांना धमकी दिल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे वाद निर्माण झाला आहे. ओवेसी यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी एका प्रचारसभेत पोलिसांना धमकीवजा इशारा दिल्याचा आरोप आहे. दरम्यान ओवेसींनी व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्पष्टीकरण दिले असून आपण पोलिसांना ही धमकी दिली नसल्याचे म्हटले आहे. आपल्या भाषणातील मोजका भाग एडिट करुन व्हायरल करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेशातील मुस्लिमांवर पोलिसांकडून अत्याचार होत असल्याचे सांगत ओवेसी यांनी या प्रचारसभेत पोलिसांना धमकी दिल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत असल्याचा आरोप आहे. योगी आदित्यनाथ हे नेहमी मुख्यमंत्री राहणार नाहीत आणि नरेंद्र मोदी हे नेहमी पंतप्रधान राहणार नाहीत. मुस्लिमांवर पोलिसांकडून अत्याचार होत असून हा अन्याय आम्ही कधीही विसरणार नाही. हा अन्याय आम्ही लक्षात ठेवू. तुम्हाला अल्लाह त्याच्या शक्तीने नष्ट करेल. परिस्थिती बदलणार आहे. योगी पुन्हा मठात जातील आणि मोदी हिमालयात जातील, त्यावेळी तुम्हाला कोण वाचवणार?, असे ओवेसी म्हणाल्याचा दावा विरोधक करत आहेत.


दरम्यान ओवेसी यांनी व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर निर्माण होणारा वाद पाहून स्पष्टीकरण दिले आहे. आपल्या भाषणातील काही भाग काढून व्हायरल करत चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचा दावा ओवेसी यांनी केला आहे. माझ्या ४५ मिनिटांच्या भाषणातील एक मिनिटांचा व्हिडीओ एडिट करुन व्हायरल करण्यात आल्याचे ते म्हणाले आहेत. हिंसाचाराला चालना देणारी कोणतीही धमकी मी दिली नाही. केवळ पोलिसांच्या अत्याचाराबाबत मी भाष्य केले. पोलिसांकडून मुस्लिमांवर होणारा अत्याचार आक्षेपार्ह असून त्यांना कुणाचे संरक्षण मिळते? मोदी व योगी यांचे का?, असा सवाल विचारला. पण सोशल मीडियावर चुकीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याचे ओवेसी म्हणाले.


दरम्यान विरोधकांनी ओवेसींच्या या भाषणावर टीका केली असून शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वैदी यांनी हे लाजिरवाणे असल्याचे म्हटले आहे. तर भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी ओवेसी यांच्यावर टीका केली असून त्यांची तुलना मुहम्मद अली जिना यांच्याशी केली आहे.