ओमिक्रॉनपासून बचावासाठी लसीकरणाशिवाय कोणती काळजी घ्यावी? केंद्राची महत्वाची माहिती


नवी दिल्ली – ओमिक्रॉनबाधितांच्या रूग्णांमध्ये भारतात सातत्याने वाढ होत आहे. यातील काळजीची बाब म्हणजे १० रूग्णांपैकी ९ कोरोना रूग्णांनी लसीचे दोन्ही डोस घेऊनही त्यांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले आहे. १८३ ओमिक्रॉनबाधितांचा यासाठी अभ्यास करण्यात आला. केंद्र सरकारने या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (२४ डिसेंबर) कोरोनाच्या ओमिक्रॉनच्या संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी केवळ लस पुरेशी नसल्याचे म्हटले आहे. तसेच नागरिकांना काही गोष्टींची काळजी घेण्याचे आवाहन करत प्रादुर्भावाच्या धोक्याबाबत गंभीर इशारा देण्यात आला.

सध्या देशातील १७ राज्यांमध्ये ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव पोहचला आहे. देशभरात आतापर्यंत एकूण ४१४ ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत. यातील अनेक रूग्ण तर असेही आहेत, ज्यांनी कुठेच बाहेर प्रवास केलेला नाही, तरीही त्यांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. सर्वाधिक ओमिक्रॉन रूग्ण महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा आणि तामिळनाडूत आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांनी यावरील अभ्यास जारी करत सांगितले की २७ टक्के रूग्णांनी परदेशात कोणताही प्रवास केलेला नाही, त्यानंतरही त्यांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे.

ओमिक्रॉनच्या संसर्गाबाबतचे धोके सांगतानाच कोरोना विरोधी लस संरक्षणासाठी पुरेशी नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले. तसेच प्रादुर्भावापासून बचावासाठी लसीकरणासोबतच नागरिकांनी सतर्क रहावे आणि मास्क घालण्याची सवय लावावी, असे सांगितले. हेच संसर्गापासूनचे बचावाचे उपाय असल्याचेही केंद्र सरकारने नमूद केले आहे.

भारतात एकूण ओमिक्रॉन रूग्णांपैकी तब्बल ९१ टक्के रूग्णांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले असताना देखील त्यांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. याशिवाय ८७ पैकी ३ रूग्णांनी तर लसीचा बुस्टर डोस घेऊनही त्यांना संसर्ग झाला आहे. १८३ पैकी केवळ ७ रूग्णांनी लसीचा एकही डोस घेतलेला नव्हता. दोन जणांनी लसीचा एक-एक डोस घेतला होता.