साताऱ्यात आढळले आणखी दोन ‘ओमिक्रॉन’बाधित


फलटण – ओमिक्रॉनचे आणखी दोन रुग्ण सातारा जिल्ह्यात आढळले आले असून, आता एकूण ओमिक्रॉनबाधितांची संख्या पाच झाली आहे. फलटण तालुक्यातील हे सर्व रुग्ण आहेत. कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकाराबाबत जिल्हा प्रशासन तसेच आरोग्य यंत्रणा सतर्क आहे. या पार्श्वभूमीवर परदेशातून येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करण्यात येत आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात ६१४ जण परदेशातून आले आहेत. यांपैकी ३९३ जणांची चाचणी करण्यात आली आहे. यात फलटण तालुक्यातील चौघांना तसेच खंडाळा तालुक्यातील एकाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर कोरोनाबाधित अहवाल आल्यानंतर संबंधितांचे नमुने ओमिक्रॉन चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील फलटणमधील तिघांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे समोर आल्यामुळे आरोग्य विभागाने या ओमिक्रॉनबाधितांच्या निकट असणाऱ्या दोघांचे नमुने घेऊन चाचणी केल्यानंतर त्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.

यानंतर, या दोघांचे नमुने ओमिक्रॉनच्या तपासणीसाठी आरोग्य विभागाने पाठविले. याचा अहवाल शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झाला असून, या दोघांनाही ओमिक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील आठवड्यात बाधित झालेल्या रुग्णांचे हे नातेवाईक आहेत. यामुळे जिल्ह्यात आता ओमिक्रॉनचे एकूण पाच रुग्ण झाल्याचे समोर आले आहे. फलटण तालुक्यातील एकूण पाच जण बाधित आहेत. दरम्यान, खंडाळा तालुक्यातील कोरोना बाधितांचा ओमिक्रॉन चाचणीचा अहवाल येणे बाकी आहे.