चीनमधील संपूर्ण शहर क्वारंटाईन होण्यास पाकिस्तानातून आलेले विमान कारणीभूत


बीजिंग – चीनमधील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सातत्याने वाढ होत असून याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक असणाऱ्या शीआन शहरामध्ये लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. चीनने या लॉकडाउनची घोषणा करतानाच आपल्या अधिकाऱ्यांना शिक्षा देखील सुनावली आहे. अचानक चीनमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येचा विस्फोट होण्यामागे अप्रत्यक्षपणे पाकिस्तान कनेक्शन असल्याची माहिती समोर आली आहे. चीनमधील कोरोनाच्या या नवीन प्रादुर्भावासाठी पाकिस्तानमधून आलेले एक विमान कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे.

चीनच्या केंद्रीय अनुशासन निरीक्षण आयोगाने जारी केलेल्या एका वक्तव्यानुसार शीआनमधील २६ अधिकाऱ्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. २६ अधिकाऱ्यांना चांगले काम न केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांना शिक्षाही सुनावण्यात येणार आहे. पण ही शिक्षा काय असेल याबद्दलची सविस्तर माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

शुक्रवारी चीनने दिलेल्या माहितीनुसार सरकारी अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पडणे अपेक्षित होते. पण त्यांनी तसे केले नाही. आता अशाच काही बेजबाबदार लोकांमुळे एक कोटीहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या शीआन शहरामध्ये लॉकडाउन करावा लागल्याचे चीन सरकारने म्हटले आहे. शीआनमधून बाहेर जाणारी आणि येणारी विमान सेवा, ट्रेन सेवाही बंद करण्यात आली आहे. शीआन शहर हे चीनच्या पहिल्या सम्राटाची राजधानी तसेच टेराकोटा योद्ध्यांच्या पुतळ्यांसाठी प्रसिद्ध आहे.

चीनने गुरुवारी पश्चिमेकडील शीआन शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर निर्बंध लागू करत लॉकडाउनची घोषणा केली. दोन वर्षांपूर्वी वुहानमध्ये कोरोनाचा सर्वात आधी प्रादुर्भाव झाला होता. त्यावेळी घेण्यात आलेल्या कठोर निर्णयांनंतरचा हा सर्वात मोठा निर्णय असल्याचे सांगितले जात आहे.

चीनने आपल्या झीरो टॉलरन्स ध्येयाचा उल्लेख करत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे निर्बंध आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. चीनमधील शीआन शहरातील नागरिकांना घरीच थांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आवश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी घरातील एकाच व्यक्तीला दिवसाआड बाहेर पडण्याची मूभा देण्यात आली आहे. या शहरामध्ये एक कोटी ३० लाख लोक राहतात. अगदीच अत्यावश्यक कामासाठी शहराबाहेर जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण त्यासाठीही सरकारकडून विशेष परवाना जारी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.