ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा मोठा निर्णय


नवी दिल्ली – एकीकडे कोरोनाबाधितांची वाढती संख्या, तर दुसरीकडे ओमिक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव यामुळे काही राज्यांनी निर्बंध लावले असून केंद्रानेही आता त्यादृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ओमिक्रॉन रुग्ण जास्त असणाऱ्या तसेच कमी लसीकरणाचा वेग कमी असणाऱ्या राज्यांमध्ये पथके पाठवण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. या टीम देशभरातील १० राज्यांमध्ये पाठवण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

ज्या राज्यांमध्ये ही पथके पाठवण्यात येणार आहेत त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. महाराष्ट्रासोबत केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, मिझोरम, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि पंजाब या राज्यांचा समावेश आहे. ही पथके कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, तसेच पाळत ठेवणे आणि प्रतिबंधात्मक कारवायांवर लक्ष ठेवणार आहेत. त्याचबरोबर कोरोना चाचणी, कोरोनासंबंधित नियमांचे पालन, त्यांची अंमलबजावणी, रुग्णालयात उपलब्ध बेड्स यांची पाहणी केली जणार आहे. रुग्णवाहिका, व्हेंटिलेटर आणि मेडिकल ऑक्सिजन यांची उपलब्धता कितपत आहे, याचीही माहिती घेतली जाईल. विशेष म्हणजे लसीकरणाची प्रगती कशापद्धतीने सुरु आहे, याकडे लक्ष दिले जाईल.

कोरोना साथीच्या चौथ्या लाटेचा सध्या जग सामना करीत असल्याचे निदर्शनास आणत केंद्र सरकारने शुक्रवारी गंभीर इशारा दिला आहे. नाताळच्या पार्श्वभूमीवर लोकांनी गर्दी आणि अनावश्यक प्रवास टाळावा, कोरोना प्रतिबंधक नियम पाळावेत, त्याचबरोबर त्वरित लसीकरण करावे, असे आवाहन केंद्राने केले. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाच्या नव्या उत्परिवर्तित विषाणूचे ३५८ रुग्ण आढळले.

देशातील ओमिक्रॉन रुग्णसंख्येने शनिवारी ४०० चा टप्पा ओलांडला आहे. सध्या देशात ओमिक्रॉनचे ४१५ रुग्ण आहेत. यामुळेच अनेक राज्यांनी निर्बंध जाहीर केले असून नाईट कर्फ्यूचीही घोषणा करण्यात आली आहे.