उदयनराजेंच्या ‘काय बाई सांगू कसं गं सांगू’वरुन शिवेंद्रराजेंचा टोला


सातारा – भाजपचे राज्यसभेवरील खासदार उदयनराजे भोसले आणि सातारा जावळीचे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात सातारा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगताना दिसतो आहे. नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन दोन्ही राजेंनी विकासकामांचा धडाका सुरु केला आहे. पण दोन्ही नेते या विकासकामांच्या उद्घाटनांच्या कार्यक्रमांमधूनही एकमेकांवर टीका टीप्पणी करताना दिसत आहेत. उदयनराजे भोसलेंनी कालच ‘काय बाई सांगू कसं गं सांगू’ गाणे म्हणत शिवेंद्रराजेंवर निशाणा साधल्यानंतर आज शिवेंद्रराजेंनी या टीकेला उत्तर दिले आहे.

उदयनराजे यांनी सातारा नगरपालिकेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन केले, यावेळी उदयनराजे यांनी भावुक होत आय लव सातारकर, असे उदगार काढले होते. यावर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सडकून टीका केली आहे. या इमारतीचा प्रस्ताव नाही, बजेट नसून तांत्रिक मान्यता नसल्याचे सांगत नारळ फोडून, गाणी गाऊन लोक मोकळी झाली. काय बाई सांगू वगैरे गाणी गाण्यापेक्षा तुम्हाला नक्की लाज कशाची वाटते हे सातरकरांना कळू दे. नेहमीच्या टॅकटीक्स झाल्या आहेत या. दहा मिनिटे रडायचे आणि जाता पप्पी घ्यायची हे नेहमीचे झाले आहे. या सर्व मुद्द्यावरुन टीका होऊ लागली आहे. तुम्ही कामांचे बोला. पाच वर्ष तुम्हाला सत्ता दिली, तुम्ही भ्रष्टाचारमुक्त पालिका करणार होता, मात्र हे कुठे गेले?, असा सवाल शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंवर टीका करताना उपस्थित केला.

सध्या वापरण्यात येणाऱ्या या टॅकटीक्स लक्षात घ्या. गळ्यात पडायचे, पप्प्या घ्यायचे हे जे प्रेम आहे ते मनापासून नाही. हे मतांपुरतेच प्रेम आहे. हे प्रेम सातारकरांनी ओळखले पाहिजे, असेही शिवेंद्रराजे भाषणात म्हणाले. शिवेंद्रराजेंनी आज उदयनराजेंनी केलेल्या या टीकेला उत्तर दिले. आज विविध विकासकामांचे उद्धाटन शिवेंद्रराजेंच्या हस्ते करण्यात आले. साताऱ्यातील रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजन प्रसंगी शिवेंद्रराजेंनी चक्क जेसीबी चालवला. जेसीबीचे स्टेरिंग त्यांनी हातात घेत रस्त्याचे भूमिपूजन केले. यावेळी अनेक समर्थक आणि नागरिक उपस्थित होते. उदयनराजे आपल्या हटके स्टाईलने नेहमीच चर्चेत असतात. चाहत्यांच्या आग्रहास्तव शहरातून दुचाकी चालवणे, सुसाट जिप्सी राईडचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतात. याचीच आठवण आज शिवेंद्रराजेंना जेसीबीचे स्टेरिंग हाती घेऊन, तो चालवताना आला.