देशातील ओमिक्रॉनबाधितांच्या संख्येत वाढ; केंद्र सरकारकडून काळजी घेण्याचे आवाहन


नवी दिल्ली – देशभरातील ओमिक्रॉनबाधितांच्या आकडेवारीत वेगाने वाढ होत आहे. वाढत्या ओमिक्रॉनबाधितांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, दिल्लीसह काही राज्यांनी रात्रीच्या वेळी संचार बंदी लागू केली आहे. ओमिक्रॉनची कोणतीही लक्षणे दिसून येत नसल्यामुळे या व्हेरिएंटबाबत चिंता वाढली आहे. देशातील 183 ओमिक्रॉनबाधितांचा अभ्यास करण्यात आला. त्यातील 70 टक्के बाधितांमध्ये कोणतीही लक्षणे दिसली नाहीत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, या व्हेरिएंटचे जगातील 108 देशांमध्ये आतापर्यंत दीड लाखांपेक्षा अधिक बाधित आहेत. तर, 26 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत 17 राज्यांमध्ये आतापर्यंत ओमिक्रॉनचे 415 प्रकरणे समोर आली आहे. त्यापैकी 115 बाधित पूर्णपणे बरे झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 108 ओमिक्रॉनबाधितांची नोंद करण्यात आली आहे. भारतात ओमिक्रॉनमुळे आतापर्यंत एकही जणाचा मृत्यू झालेला नाही.

संपूर्ण जग कोरोनाच्या चौथ्या लाटेचा सामना करत असून काळजी घेण्याचे आवाहन सरकारने केले आहे. वर्षाच्या शेवटी होणारे उत्सव, कार्यक्रमांमध्ये गर्दी न करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. गर्दीची ठिकाणे आणि अनावश्यक प्रवास न करण्याचे आवाहनही सरकारने केले आहे.

दरम्यान, नव्याने सापडणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मुंबईत अचानक वाढायला लागली आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नाईट कर्फ्यूही जारी केला आहे. पण, तरीही बाजारपेठांमधील गर्दी काही कमी होताना दिसत नाही. दादरच्या भाजी बाजारात पहाटे साडेपाच वाजताच मोठी गर्दी दिसून आली. आश्चर्याची बाब म्हणजे काल मध्यरात्रीपासून नाईट कर्फ्यू लागू असूनही येथे गर्दी नियंत्रित करण्यासाठी, बेशिस्त नागरिकांना हटकण्यासाठी पोलीसही अनुपस्थित होते. अशा गर्दीत ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव बळावला, तर राज्यावरील निर्बंध अधिक कठोर होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनीच शिस्त पाळण्याची गरज आहे.